पीटीआय, कीव्ह (युक्रेन) : रशियाच्या नियंत्रणात असलेले युक्रेनचे चार प्रदेश शुक्रवारी अधिकृतरीत्या विलीन केले जातील, अशी घोषणा रशियाने केली आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या उपस्थितीत क्रेमलिन प्रासादात हा विलीनीकरण सोहळा होईल, असे रशियाच्या सरकारने जाहीर केले आहे. युक्रेनमधील डोनेस्क, खेरसन, लुहान्स्क आणि झापोरीझिया या भागांमध्ये रशियाने सार्वमत घेतले होते. बुधवारी रशियाधार्जिण्या प्रशासकांनी चारही प्रांतांमध्ये रशियात समावेशाच्या बाजूने कौल असल्याचा दावा केला. त्यानंतर लगेचच रशिया सरकारचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी या प्रदेशांच्या अधिकृत विलीनीकरणाची घोषणा केली. क्रेमलिनमधील जॉर्ज सभागृहात चारही प्रांतांचे प्रशासक विलीनीकरणाच्या करारावर स्वाक्षऱ्या करतील, असे त्यांनी जाहीर केले.
या रशियापुरस्कृत सार्वमताला युक्रेन, अमेरिका आणि युरोपीय देशांचा विरोध आहे. बंदुकीच्या धाकावर बळजबरीने सार्वमत घेतले गेल्याचा आरोप करत रशियाने बळकावलेला प्रदेश परत घेण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे, असा दावा युक्रेनने केला. तर या नकली सार्वमताचा निकाल कधीही मान्य केला जाणार नाही, असे जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री अॅनालेना बीबॉक यांनी म्हटले.