मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एकतर्फी विलीनीकरण केलेल्या युक्रेनच्या चार प्रांतांमध्ये लष्करी आणीबाणी जाहीर केली आहे. रशियाने जिंकलेले प्रांत परत मिळवण्यासाठी युक्रेनच्या फौजांची घोडदौड सुरू असताना पुतिन यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून चारही प्रांतांच्या रशियाधार्जिण्या प्रमुखांना अधिक अधिकार बहाल करण्यात आले आहेत.
लुहान्स्क, डोनेत्स्क, झापोरीझ्झिया आणि खेरसन या चार प्रांतांमध्ये लष्करी आणीबाणी (मार्शल लॉ) लागू करण्याच्या निर्णयावर पुतिन यांनी बुधवारी स्वाक्षऱ्या केल्या. गुरुवारपासून या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे. ‘रशिया आणि रशियाच्या नागरिकांचे भवितव्य सुरक्षित व्हावे, यासाठी एक मोठे काम तडीस नेण्याचे आम्ही करत आहोत. जे आता आघाडीवर आहेत किंवा जे लष्करी प्रशिक्षण घेत आहेत, त्यांना आपल्या पािठब्याची खात्री द्यावी लागेल,’ असे पुतिन यांनी म्हटले आहे.
संपूर्ण रशियात आणीबाणी?
सध्या पुतिन यांनी केवळ युक्रेनच्या चार प्रांतांमध्ये आणीबाणी जाहीर केली असली, तरी आगामी काळात संपूर्ण देशात लष्करी कायदा अस्तित्वात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुतिन यांच्या आदेशामध्ये रशियाच्या सीमा बंद करण्याची कोणतीही घोषणा नसल्याचे क्रेमलिनचे प्रवक्ता दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटले आहे.