टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क हे त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. मस्क हे सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. पण त्यांच्या मते ते जगातले सर्वात श्रीमंत नाहीत. एलोन मस्क स्वतःला नाही, तर दुसऱ्या एका व्यक्तीला जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती मानतात. मस्क यांच्या मते, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आहेत. बिझनेस इनसाइडरला दिलेल्या मुलाखतीत मस्क यांनी ही माहिती दिली.
मस्क यांना त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल विचारण्यात आले, त्यावर उत्तर देत ते म्हणाले की, “मला वाटते की पुतिन माझ्यापेक्षा श्रीमंत आहेत.” एलोन मस्क यांची एकूण संपत्ती सुमारे २६० अब्ज डॉलर्स आहे. तर, पुतिन यांच्या संपत्तीचे रहस्य कायम आहे. त्यांची संपत्ती किती आहे, याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
अधिकृत नोंदीनुसार त्यांना वर्षाला फक्त १४०,००० डॉलर पगार मिळतो. एवढेच नाही तर पुतिन यांच्याकडे काळ्या समुद्रावर १.४ बिलियन डॉलर किमतीचा राजवाडा आणि ४ बिलियन डॉलर किमतीचे मोनॅको अपार्टमेंट देखील आहे. त्यांचा ८०० स्क्वेअर फुटांचा फ्लॅट, एक ट्रेलर आणि तीन कार आहेत.
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाबाबत मस्क यांना विचारले असता मस्क म्हणाले की, पुतिन यांना थांबवायला हवं. यापूर्वी अनेकदा मस्क यांनी जाहीरपणे युक्रेनचं समर्थन केलंय.