रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका निर्णयाचं कौतुक केलं आहे. तसेच रशियाने भारताकडून शिकण्यासारखं आहे, असंही नमूद केलं. ते ८ व्या इस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये बोलत होते. दिल्लीत झालेल्या जी२० परिषदेला गैरहजर असलेल्या व्लादिमिर पुतिन यांनी केलेल्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
व्लादिमीर पुतिन म्हणाले, “याबाबत रशियाच्या सहकारी देशांकडून शिकण्यासारखं आहे. यात भारताचं नाव घ्यावं लागेल. त्यांनी भारतात उत्पादित केलेल्या कार आणि जहाजांच्या उत्पादनावर आणि वापरावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलं आहे.”
“यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना भारतात तयार झालेल्या ब्रँडच्या वापराला प्रोत्साहन देऊन योग्य गोष्ट करत आहेत. रशियातही ती वाहनं उपलब्ध आहेत आणि आपण ती वापरली पाहिजेत,” असं मत पुतिन यांनी व्यक्त केलं.
“पाश्चिमात्यांचा हेतू फोल”
दरम्यान, दिल्लीतील ‘जी-२०’ समूहाची शिखर परिषद अत्यंत यशस्वी झाली. युक्रेन मुद्दय़ावरून संपूर्ण शिखर परिषद ताब्यात घेण्याचा पाश्चिमात्य देशांचा हेतू आम्ही फोल ठरवला, अशी आक्रमक प्रतिक्रिया रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गे लाव्हरोव्ह यांनी रविवारी ‘जी-२०’च्या शिखर परिषदेच्या सांगता समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना दिली होती. दिल्ली घोषणापत्रात रशियाचा उल्लेख न झाल्याने संतुष्ट झालेल्या लाव्हरोव्ह यांनी भारताच्या ‘जी-२०’तील कामगिरीचे कौतुक केले होते.
हेही वाचा : विश्लेषण : प्रिगोझिन यांच्यापश्चात ‘वॅग्नेर’चे भवितव्य काय?
रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गे लाव्हरोव्ह म्हणाले होते, “युक्रेन मुद्दय़ावरून पाश्चिमात्य देशांना शिखर परिषद दावणीला बांधता आली नाही. जी-२० शिखर परिषद युक्रेनमय करण्याचा पाश्चात्य देशांचा हेतू फोल ठरवण्यात आम्ही यशस्वी झालो. ‘जी-२०’ समूहावर आता पाश्चिमात्य देशांचे वर्चस्व राहू शकणार नाही. जगात नवे सत्ताकेंद्र निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. वैयक्तिक लाभासाठी जी-२० व्यासपीठाचा कुठल्याही देशाने दुरुपयोग करू नये.”