रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जगाची चिंता वाढलेली आहे. या युद्धामुळे जगावर अण्वस्त्र हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. याच कारणामुळे युरोपीयन देश सध्या भयछायेत आहेत. दोन्ही देशांतील युद्ध अजूनही थांबलेले नाही. युक्रेनमधील भारतीय नागरिकांनी शक्य तिकक्या लवकर आणि उपलब्ध असेल त्या मार्गाने युक्रेनमधून बाहेर पडावे, अशी सूचना किव्हमधील भारतीय दुतावासाकडून देण्यात आली आहे. यापूर्वी १९ ऑक्टोबर रोजीही भारतीय दुतावासाडून अशाच प्रकारची सूचना देण्यात आली होती. त्यानंतर अनेक भारतीयांना युक्रेनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान युक्रेनमध्ये अणवस्त्राचा वापर करण्याचा मॉस्कोचा कोणताही विचार नसल्याचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटल्याचं पीटीआयाने एपी च्या हवाल्याने वृत्त दिलं आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एकतर्फी विलीनीकरण केलेल्या युक्रेनच्या चार प्रांतांमध्ये लष्करी आणीबाणी जाहीर केली आहे. रशियाने जिंकलेले प्रांत परत मिळवण्यासाठी युक्रेनच्या फौजांची घोडदौड सुरू असताना पुतिन यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून चारही प्रांतांच्या रशियाधार्जिण्या प्रमुखांना अधिक अधिकार बहाल करण्यात आले आहेत. लुहान्स्क, डोनेत्स्क, झापोरीझ्झिया आणि खेरसन या चार प्रांतांमध्ये लष्करी आणीबाणी (मार्शल लॉ) लागू करण्याच्या निर्णयावर पुतिन यांनी बुधवारी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी रशियाचे संरक्षण मंत्री सेर्गेई शोइगु यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. यावेळी राजनाथ सिंह यांनी युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धात ‘डर्टी बॉम्ब’वापरण्याच्या कथित धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली. युक्रेनकडून ‘डर्टी बॉम्ब’चा वापर केला जाईल, याची आम्हाला चिंता आहे, असं शोईगु यांनी मंगळवारी सांगितलं होतं. त्यानंतर कथित ‘डर्टी बॉम्ब’चा हल्ला रोखण्यासाठी रशिया अणुहल्ला करू शकतो, याबाबत जगभरात चिंता व्यक्त केली गेली.