मागील काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन या दोन देशात युद्ध सुरू आहे. दोन्ही देशात सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या घडामोडी घडत आहेत. युद्ध सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच अमेरिकेनं रशियाविरोधी कठोर धोरण स्वीकारलं होतं. तर रशियानं आक्रमण केल्यानंतर काही दिवसातच युक्रेन युद्धात हार पत्करेल असं सर्वांना वाटत होतं. पण युक्रेनिअन सैन्य आणि नागरिकांनी आपल्या मायभूमीसाठी चिवट लढा देत रशियाला जेरीस आणलं आहे.
युक्रेन आणि रशिया दोन्ही देशात युद्ध धगधगत असताना आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी जर्मनी आणि फ्रान्स देशांच्या नेत्यांना तीव्र इशारा दिला आहे. युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा वाढवल्यावरून पुतीन यांनी ही चेतावणी दिली. अशा पद्धतीने शस्त्रांचा पुरवठा केल्याने पाश्चिमात्य समर्थक देशातील परिस्थिती आणखी अस्थिर होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
पुतीन यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांना उद्देशून म्हटलं की, युक्रेनला सतत शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणं धोकादायक आहे. यामुळे परिस्थिती आणखी चिघळून आणि मानवी संकटात आणखी वाढ होण्याचा धोका आहे, असा इशारा पुतीन यांनी दिला आहे.