रशियात चार भारतीय विद्यार्थ्यांचा नदीत बुडून मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली आहे. हे चारही विद्यार्थी भारतातील असून रशियामधील यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते. सेंट पीटर्सबर्गच्या जवळील एका नदीच्या काठावर हे विद्यार्थी सायंकाळच्या वेळेला फिरण्यासाठी गेले असता तेथे एका मित्राला वाचवताना ४ भारतीय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे.
वृत्तानुसार, एकजण नदीमध्ये उतरला होता. मात्र, तो नदीत बुडायला लागल्यामुळे त्याला मदत करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचाही बुडून मृत्यू झाला आहे. यापैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे. दरम्यान, हे सर्व विद्यार्थी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
हेही वाचा : तैवानच्या राष्ट्रपतींकडून पंतप्रधान मोदींना शुभेच्छा; मोदींनी दिलेल्या उत्तरानंतर चीनचा जळफळाट
दरम्यान, या विद्यार्थ्यांचे मृतदेह लवकरात लवकर भारतात आणले जाणार आहेत. जळगाव येथील अधिकाऱ्यांकडून रशियातील स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्यात येत आहे. तसेच भारतीय दूतावासाच्या माध्यमातून रशियन अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येत असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. या घटनेत एक विद्यार्थीनीही नदीत पडली होती. मात्र, तिला वाचवण्यास यश आलं असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.
या घटनेबाबत जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या घटनेसंदर्भात पुष्टी केली असल्याचे वृत्त इंडिया टुडेनी दिले आहे. हर्षल देसले, जिशान पिंजारी, जिया पिंजारी, या घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे विद्यार्थी रशियाच्या यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये घेत होते.
दरम्यान, ही घटना ४ जून रोजी संध्याकाळी सेंट पीटर्सबर्ग जवळ असलेल्या नदीत ही घटना घडली आहे. ही घटना घडल्यानंतर रशिया येथील प्रशासन आणि पोलिसांवतीने भारतीय दूतावासाला या घटनेबाबत कळवण्यात आलं आहे. या विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. यातील हर्षल देसले या विद्यार्थ्यांचा मृतदेह भारतात पाठवण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.