रशियात कुत्र्यांना युद्धासाठी खास पॅराशूट प्रशिक्षण देण्यात आलं. या प्रशिक्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हेलिकॉप्टर किंवा विमान उतरणं ज्या ठिकाणी कठीण आहे, अशा ठिकाणी कुत्र्यांना पॅराशूटमधून खाली उतरवण्यासाठी हे प्रशिक्षण देण्यात आलं. त्याचबरोबर वरुन खाली येताना कुत्रा कसा वागतो? याबाबतही तपासणी करण्यात आली. यामागे कुत्र्यांना युद्धासाठी तयार करण्याचा मुख्य हेतू आहे. १३ हजार फुटावरून पॅराशूटमधून या कुत्र्यांना खाली सोडण्यात आलं. यावेळी त्यांच्यासोबत प्रशिक्षणार्थीसुद्धा होता. १३ हजार फुटावरून खाली आल्यानंतरही कुत्र्यांना कोणतीच इजा झाली नाही. त्याचबरोबर जमिनीवर उतरताच कमांड्स फॉलो करण्यासाठी सज्ज होते.
“या प्रशिक्षणावेळी कुत्र्यांना आठवेळा वरून खाली आणण्यात आलं. एकदा वरून खाली आल्यानंतर त्यांना पुन्हा प्लेनमध्ये नेणं आव्हानात्मक होतं. मात्र कुत्र्यांमध्ये तितकी भीती जाणवली नाही”, असं पॅराशूट प्रशिक्षणार्थी अँद्रे तोपोरकोव यांनी सांगितलं. त्यांना प्लेनमध्ये बसवल्यानंतर ते त्याचा आनंद लुटताना दिसले. तसेच खिडकीतून पृथ्वीवर बघताना त्यांना आनंद होत होता. मात्र प्लेनमधून खाली उडी टाकताना ते भेदरलेल्या अवस्थेत असायचे. तेव्हा खूप गोंधळ आणि आवाजही असायचा, असंही त्यांनी पुढे सांगितलं. कुत्र्यांसोबत एक प्रशिक्षणार्थी असायचा. तो कुत्र्यांना विश्वासात घेत गोंजरत त्यांना विश्वास द्यायचा. त्यानंतरच प्लेनमधून उडी घ्यायचा. कारण उडी घेताना कोणतीच अडचण येऊ नये, यामागचा हेतू आहे, असंही अँद्रे तोपोरकोव यांनी सांगितलं.
कुत्र्यांना २६ हजार फुटावरून खाली आणण्याचा पुढचा प्रयत्न असणार आहे. यावेळी कुत्र्यांना ऑक्सिजन पुरवठ्याची गरज देखील भासणार आहे. पॅराशूट सिंगल आणि सोबत प्रशिक्षणार्थी असं तयार करण्यात आलं आहे. त्याचबरोबर हे प्रशिक्षण २०२१ च्या शेवटापर्यंत पूर्ण होईल असंही सांगण्यात आलं आहे.