गेल्या दोन महिन्याहून अधिक काळापासून रशिया आणि युक्रेन या दोन देशांत युद्ध सुरू आहे. दोन्ही देशाचे सैनिक युद्धभूमीवर एकमेकांशी चिवट लढा देत आहेत. पण युद्धात माघार घ्यायला कुणीही तयार नाही. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांची मात्र मोठ्या प्रमाणात होरपळ होत आहे. असं असतांना रशियन सैनिकांनी अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एका रशियन सैन्याने एका १६ वर्षीय युक्रेनिअन तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, १६ वर्षीय पिडीत तरुणी ही सहा महिन्यांची गरोदर आहे. बॉम्ब विस्फोटापासून वाचण्यासाठी ती आपल्या कुटुंबीयांसह घराच्या बेसमेंटमध्ये लपून बसली होती. पण रात्री उशिरा ती अन्नाच्या शोधात बेसमेंटमधून बाहेर पडली. यावेळी एका मद्यधुंद अवस्थेतील रशियन सैनिकाची नजर तिच्यावर आणि तिच्या कुटुंबीयांवर पडली. यावेळी रशियन सैनिकानं पिडीतेसोबत इतर मुलींच्या वयाची विचारणा केली. यामध्ये पिडीत तरुणीसोबत १२ आणि १४ वयाच्या अन्य दोन मुली होत्या.
या घटनाक्रमानंतर रशियन सैनिकानं पिडीत तरुणीच्या आईला जवळ बोलावून घेतलं. तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पण तिला लगेच सोडून दिलं. यानंतर संबंधित रशियन सैनिकानं पिडीत तरुणीला जवळ बोलावून तिच्यासोबत जबरदस्ती करायला सुरुवात केली. तसेच तिच्या अंगावरील कपडे काढायला सांगितले. पण पिडीतनं कपडे काढण्यास नकार दिला. यावेळी संतापलेल्या सैनिकानं “माझ्याशी शारीरिक संबंध ठेव, नाहीतर आणखी २० जणांना बोलवेन”, अशी धमकी दिली.
पिडीत तरुणीने पुढे सांगितलं की, “आरोपी सैनिकानं तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. तसेच बलात्कार करताना प्रतिकार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. नशेत नसलेल्या अन्य एका रशियन सैनिकानं त्याला थांबण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.” “रात्री गडद अंधार असल्याने त्याचे केवळ निळे डोळे आपल्याला दिसले, बाकी काहीही आठवत नसल्याचंही पिडीत तरुणीनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. याबाबत अधिक माहिती देताना युक्रेनिअन वकिलानं सीएनएनला सांगितलं की, “आरोपांची चौकशी करण्यात आली असून हल्ल्याची पुष्टी केली आहे. संबंधित गुन्ह्याला ‘वॉर क्राइम’ असं म्हटलं आहे.”