रशियन सैनिक युक्रेनमधील नागरिकांच्या घरातील सामानच काय तर अगदी टॉयलेट सीटसुद्धा चोरण्याच्या तयारीत असतात, असा दावा युक्रेनच्या उपपरराष्ट्र मंत्री एमाईन झॅपारोव्हा यांनी केला आहे. एमीन झापारोवा या भारत दौऱ्यावर असून मंगळवारी दिल्लीत झालेल्या ‘थिंक टॅंक’ या कार्यक्रमात माध्यमांशी बोलतना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
नेमकं काय म्हणाल्या एमाईन झॅपारोव्हा?
एमाईन झॅपारोव्हा यांनी युक्रेनवर होत असलेल्या हल्ल्यावरून रशियावर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी रशियन सैनिकांवर गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या, आम्ही रशियन सैन्यातील काही अधिकाऱ्यांची त्यांच्या परिवाराबरोबर होत असलेली चर्चा गुप्त पद्धतीने ऐकली आहे. या चर्चेदरम्यान ते युक्रेनमधील नागरिकांच्या घरातील सामान चोरून नेण्याबाबत बोलत आहेत. एवढच नाही तर काही रशियन सैनिक युक्रेनमधील नागरिकांच्या घरातील टॉयलेट सीटसुद्धा चोरण्याच्या तयारीत आहेत.
पुढे बोलताना त्यांनी रशिनय सैनिकांकडून युक्रेनमधील महिलांवर लैंगिक अत्याचार केल्या जात असल्याचा आरोपही केला. रशियन सैनिकांकडून युक्रेनमधील महिला आणि मुलींवर लैंगिक अत्याचार केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच एका ११ वर्षीय मुलासमोरच त्यांनी त्याच्या आईवर अत्याचार केले. त्यानंतर त्या मुलाला मानसिक धक्का बसला, असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा – मारुती सुझुकीच्या जाहिरातीला भाजपा खासदाराचा विरोध; ‘तो’ Video ट्विट करत केली शूटिंग थांबवण्याची मागणी
यावेळी बोलताना त्यांनी भारताने रशिया-युक्रेन युद्धाबाबत घेतलेल्या भूमिकेचं कौतुक केलं. जी-२० परिषदेचा अध्यक्ष या नात्याने भारत जगात शांतता प्रस्तापित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असं त्या म्हणाल्या. तसेच भारतीय अधिकाऱ्यांनी लवकरच युक्रेनला भेट द्यावी, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.