राजधानी किव्हसह अन्य महत्त्वाच्या शहरांकडे होणाऱ्या रशियन सैन्याच्या घोडदौडीचा वेग कमी करण्यात युक्रेनच्या सैन्याला काही प्रमाणात यश आले आहे. मात्र, रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. युक्रेनमध्ये शेकडो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, युक्रेन आणि रशिया दोघांनीही या युद्धात आपले अनेक सैनिक गमावले आहेत. अशातच युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या सैन्याचा भाग असलेल्या एका रशियन सैनिकाचा शेवटचा मेसेज व्हायरल होत आहे. या सैनिकाने युक्रेनमधील परिस्थिती त्याच्या आईला सांगतली आहे.
“आई, मी युक्रेनमध्ये आहे. इथे खरंच युद्ध सुरू आहे. मला भीती वाटत आहे. आम्ही अनेक शहरांवर बॉम्ब फेकत आहोत. अगदी इथल्या नागरिकांनाही लक्ष्य करत आहोत,” असं युक्रेनमधील युद्धात एका रशियन सैनिकाने आपला जीव गमावण्यापूर्वी त्याच्या आईला पाठवलेल्या मेसेजमध्ये लिहिलंय. इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिलंय.
युक्रेन-रशिया युद्धावरील युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीच्या आपत्कालीन सत्रात, युक्रेनच्या राजदूताने युक्रेनमधील रशियन सैनिकाने त्याच्या आईला पाठवलेला हा शेवटचा मेसेज वाचून दाखवला. या मेसेजमध्ये रशियन सैनिकाची आई त्याला विचारते की त्याला मेसेजला रिप्लाय द्यायला इतका वेळ का लागतोय आणि ती त्याला पार्सल पाठवू शकते का?, यावर तो रिप्लाय देतो की, तो युक्रेनमध्ये आहे आणि स्वतःला फाशी देऊ इच्छितो.
Ukraine War: “पंतप्रधान मोदी हिंमत दाखवून पुतिन यांना…”; भाजपा खासदाराने निशाणा साधत विचारला प्रश्न
“आम्हाला सांगण्यात आलं होतं की युक्रेनियन आमचे स्वागत करतील परंतु ते आमच्या शस्त्रांनी भरलेल्या वाहनांच्या समोर येत आहेत. अनेक जण स्वतःला गाड्यांच्या चाकाखाली झोकून देत आहेत आणि आम्हाला पुढे जाऊ देत नाहीत. ते आम्हाला फॅसिस्ट म्हणतात. आई, हे सगळं खूप कठीण आहे,” असं रशियन सैनिक आपल्या आईला मेसेजमध्ये सांगतो.
UN मधील युक्रेनच्या राजदूताने २४ फेब्रुवारी रोजी रशियाने आक्रमण केल्यानंतर युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाची तीव्रता असेंब्लीच्या नजरेस आणून दिली.