शीतयुद्धोत्तर कालखंडानंतर रशिया आणि पाश्चिमात्य राष्ट्रे यांच्यातील सर्वात भीषण असा समरप्रसंग युक्रेन प्रकरणामुळे उद्भवला आहे. येथील क्रिमियात रशियाने आपल्या फौजा धाडल्या असून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध भडकण्याची चिन्हे आहेत. युरोपीय महासंघासह सर्वच राष्ट्रांनी रशियावर टीकास्त्र सोडले असून, जर्मनीच्या चँसेलर अँजेलिना मर्केल यांनी रशियासमोर संपर्क गट स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
तेलसमृद्ध युक्रेन प्रांतातील परिस्थिती क्षणाक्षणाला बदलत असून, रशियाच्या फौजा तेथे शिरल्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियाने युक्रेनच्या सार्वभौमत्वाचा भंग केल्यामुळे अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य राष्ट्रांनी रशियावर ‘र्निबध लादण्याच्या तसेच जी-८ राष्ट्रांच्या गटातून रशियाला वगळण्याच्या’ धमक्या दिल्या होत्या, मात्र रशियाचे परराष्ट्र व्यवहारमंत्री सर्जी लावरॉव्ह यांनी या धमक्यांबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
क्रिमियाच का?
क्रिमिया हा काळ्या समुद्रातील महत्त्वाचा भाग असून तेथे मोठय़ा संख्येने रशियन लोक राहतात. हा भाग तेलाच्या व्यापाराच्या दृष्टीने संवेदनशील असून युरोपच्या ऊर्जा आणि तेलविषयक गरजा रशियाशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे येथील ‘राष्ट्रविघातक शक्तींपासून’ संरक्षण करण्याचे कारण पुढे करीत रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी या शहरात सैन्य घुसविण्याचा निर्णय घेतला. शिवाय येथे रशियनबहुल वस्ती असल्याने लष्कराला पाठिंबाही मिळण्याची शक्यता लक्षात घेतली गेली. दरम्यान युरोपीय महासंघाने रशियाच्या निर्णयाविरोधात एक ठरावही संमत केला आहे.
जर्मनीचा प्रस्ताव
युक्रेन प्रश्न चिघळविण्यापेक्षा त्यावर राजकीय तोडगा काढण्यासाठी एका संपर्क गटाची स्थापना करण्यात यावी, अशी सूचना जर्मनीच्या चँसेलर अँजेलिना मर्केल यांनी केली असून, त्या सूचनेस पुतिन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, जी – ७ देशांची सोशी येथे होणारी औद्योगिक शिखर परिषद रद्द करण्यात आली.