Russia’s ‘chessboard killer’ ready to confess to 11 more murders : रशियामधील ‘सिरीयल किलर’ अलेक्झेंडर पिचुश्किन (Alexander Pichushkin) याला ४८ जणांची हत्या केल्याच्या प्रकरणात २००७ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान या भयानक ‘सिरीयल किलर’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि याचे कारण म्हणजे त्याने आणखी ११ खून कबूल करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. रशियाच्या पेनल सर्व्हिसने शनिवारी याबद्दल माहिती दिली आहे.

पिचुश्किन याचे सध्या वय ५० वर्ष असून तो दक्षिण मॉस्को येथील Bitsevsky पार्क परिसरात बेघर, दारूडे आणि वयस्कर लोकांना लक्ष्य करत असे. त्याने १९९२ ते २००६ दरम्यानच्या काळात या हत्या केल्या आहेत. रॉयटर्सने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

चेसबोर्ड किलर नाव का पडलं?

पिचुश्किन याला रशियातील माध्यमांनी ‘द चेसबोर्ड किलर’ असं टोपणनाव दिलं होतं आणि याचं कारण म्हणजे त्याने कबुली जबाब देताना त्याने सांगितलं होतं की, त्याला त्याच्या प्रत्येक बळीसाठी ६४-चौरस असणाऱ्या बुद्धिबळाच्या पटावरील प्रत्येक चौकोनात एक कॉईन ठेवण्याची इच्छा होती.

दरम्यान शिक्षा झाल्यापासून पिचुश्किन याला रशियाच्या आर्टिक नॉर्थ येथील दुर्गम भागात असलेल्या पोलर आऊल (Polar Owl) कारागृहात ठेवण्यात आले आहे.

रशियाच्या पेनल सर्व्हिसने शनिवारी टेलिग्राम मेसेंजर अॅपवर एख निवेदन जारी केले आहे. ज्यानुसार पिचुश्किन याने तपासकर्त्यांना तो पुरूष आणि महिलांच्या आणखी ११ हत्यांबद्दल कबुली देण्यास तयार असल्याचे सांगितले आहे.

सर्वाधिक हत्या करणारा सिरीयल किलर

आधीपासूनच पुचिश्किन याला ज्या खूनांच्या आरोपांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे, त्याहीपेक्षा त्याने अधिक खून केल्याचा संशय होता. त्याच्या खटल्याची सुनावणी सुरू असताना त्याने६३ जणांची हत्या केल्याचा दावा केला होता, परंतु सरकारी वकिलांनी त्याच्यावर फक्त ४८ खून आणि तीन जणांचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप ठेवले होते.

जर पुचिश्किन याला या अतिरिक्त खूनांसाठी दोषी ठरवले गेले तर तो रशियामधील सर्वाधिक खून करणारा सिरीयल किलर ठरेल. कारण यापूर्वी माजी पोलिस अधिकारी मिखाइल पॉपकोव्ह (Mikhail Popkov) याला ७८ खूनांसाठी दोषी ठरवण्यात आले आहे.