वॉशिंग्टन : ‘‘भारत आणि अमेरिकेचे संबंध आतापर्यंत कधी नव्हे एवढे चांगल्या उच्च स्तरावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार उभय देशांतील संबंधांना एका वेगळय़ा पातळीवर नेईल. हे द्विपक्षीय संबंध चंद्रयानाप्रमाणे जणू चंद्रापर्यंतच नव्हे तर त्याही पलीकडे पोहोचतील,’’ असा विश्वास परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केला.
येथील भारतीय दूतावासाने शनिवारी आयोजित केलेल्या ‘सेलिब्रेटिंग कलर्स ऑफ फ्रेंडशिप’ सोहळय़ात अमेरिकेच्या विविध भागांतून ‘इंडिया हाऊस’ येथे जमलेल्या शेकडो भारतीय वंशांच्या अमेरिकन नागरिकांना संबोधित करताना जयशंकर बोलत होते.
हेही वाचा >>> अमेरिकेतील पेच टळला; सरकारी खर्चाला मंजुरी
जयशंकर म्हणाले, की उभय देशांतील संबंधांनी आतापर्यंतची सर्वाधिक उंची गाठल्याचे चित्र आज दिसत आहे. आम्ही या संबंधांना एका वेगळय़ा स्तरावर घेऊन जाणार आहोत. ‘जी-२०’ शिखर परिषदेचे यश अमेरिकेच्या सहकार्याशिवाय शक्य झाले नसते. जेव्हा आयोजन यशस्वी होते तेव्हा यजमानाला नेहमीच श्रेय मिळते. तेही योग्यच आहे, परंतु सर्व ‘जी-२०’ सदस्य देशांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले नसते तर ते शक्य झाले नसते.
टाळय़ांच्या कडकडाटात जयशंकर म्हणाले, की ‘‘मी आज या अमेरिकेत आणि विशेषत: या देशाची राजधानी मी वॉिशग्टनमध्ये आहे. मला हे आवर्जून सांगयलाच हवे कारण ‘जी-२०’ यशस्वी करण्यासाठी अमेरिकेकडून आम्हाला मिळालेले योगदान, सहकार्य आणि मार्गदर्शनाबाबत आम्ही जाहीर कृतज्ञता व्यक्त करतो. हे जरी आयोजनातील आमचे दृश्य यश असले तरी ते जी-२० सदस्य राष्ट्रांचेच यश होते. भारत-अमेरिका भागीदारीचे यशही होते, असे मी मानतो.’’
कृपया उभय देशांतील या भागीदारीला आवश्यक आणि अपेक्षित सुयोग्य समर्थन देणे असेच कायम ठेवा. मी तुम्हाला वचन देतो, की दोन्ही देशांतील संबंधांची उंची चंद्रयानाप्रमाणे चंद्रापर्यंत कदाचित त्यापलीकडेही पोहोचेल. दोन्ही देशांतील मानवी संबंध हे द्विपक्षीय संबंध अधिक अद्वितीय बनवत आहेत. – एस. जयशंकर, भारताचे परराष्ट्रमंत्री