S Jaishankar on India Canada Relations : भारत आणि कॅनडाचे संबंध दिवसेंदिवस खराब होत चालले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो सातत्याने भारतविरोधी शक्तींना देशात आश्रय देताना दिसत आहेत. परंतु, भारताला ते मान्य नाही. त्यामुळे भारताने आपले कॅनडातील उच्चायुक्त आणि अन्य राजनैतिक अधिकार्‍यांना परत बोलावून घेतलं आहे. त्यानंतर कॅनडाचे भारतातील अधिकारी देखील माघारी परतले आहेत. खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारताच्या कथित सहभागाबाबतच्या आरोपानंतर भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडत गेले आहेत. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर व्होट बँकेच्या राजकारणात गुंतल्याचा आरोप करीत हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येबाबत भारतावर करण्यात आलेले आरोप भारताने फेटाळले आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांच्या प्रत्येकी सहा राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी केली आहे.

दरम्यान, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी यावर भारताची नेमकी भूमिका स्पष्ट केली आहे. एस. जयशंकर यांनी शनिवारी (२६ ऑक्टोबर) पुण्यातील एका कार्यक्रमात सांगितलं की “भारताने कॅनडातील संघटित गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित केला होता. परंतु, कॅनडा सरकारने त्याकडे डोळेझाक केली. कॅनडाचं सरकार भारतीय उच्चायुक्त व तिथल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना लक्ष्य करत होतं. त्याला भारताने जशास तसं प्रत्युत्तर दिलं. भारताच्या राष्ट्रहिताचा, अखंडतेचा किंवा सार्वभौमत्त्वाचा प्रश्न येतो तेव्हा भारत कठोर पावलं उचलतो. ट्रुडो सरकारने आपल्या उच्चायुक्तांना व तिथल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना लक्ष्य केल्यानंतर भारतानेही त्या कृतीला योग्य उत्तर दिलं आहे”.

हे ही वाचा > > Dating App Fraud: धक्कादायक! एक कोल्ड्रिंक पडलं १६ हजारांना; डेटिंग ॲपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, “तिथे एक एक छोटासा गट आहे, ज्याने स्वःला मोठी राजकीय शक्ती बनवलं आहे. दुर्दैवाने तिथल्या देशाचे राजकारणी त्या गटाचं लांगुलचालन करत आहेत. ते केवळ आपल्यासाठीच नव्हे तर उभय देशांच्या संबंधांसाठी वाईट आहे. मी तर म्हणेन की ते कॅनडासाठी देखील धोक्याचं आहे”.

हे ही वाचा >> Pregnant teen murder: गर्भवती प्रेयसीचा लग्नासाठी तगादा; प्रियकरानं करवा चौथचा उपवास ठेवायला सांगितला आणि नंतर खड्डा खणून…

कॅनडाने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला; भारताचे उच्चायुक्त

लोकशाही असलेल्या देशाने पाठीत खंजीर खुपसल्याचा गंभीर आरोप भारताचे उच्चायुक्त संजय वर्मा यांनी कॅनडाच्या वागणुकीवर आक्षेप घेताना केला. कॅनडाने अत्यंत अव्यावसायिक पद्धतीने वागवल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. भारतात परतल्यानंतर बुधवारी ‘पीटीआय’शी विविध मुद्द्यांवर बोलताना वर्मा यांनी कॅनडातील खलिस्तानी चळवळीची उत्पत्ती, स्थानिक राजकारण्यांकडून निवडणुकीतील फायद्यासाठी मिळत असलेला पाठिंबा आदींविषयी सांगितले. खलिस्तानी आपली संख्या वाढवण्यासाठी गुन्हेगारी कारवाया करतात, असा आरोपही त्यांनी केला.