खलिस्तानवादी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता. ट्रुडो यांच्या या आरोपानंतर भारत आणि कॅनडामधील राजनैतिक संबंध ताणले गेले आहेत. जस्टिन ट्रुडो सातत्याने भारतावर आरोप करत आहेत, तसेच आपल्याकडे भारताविरोधातले पुरावे असल्याचा दावा करत आहेत. दुसऱ्या बाजूला भारताने ट्रुडो यांचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच, भारताने २१ सप्टेंबर रोजी कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्याची सेवा तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या दोन महिन्यांपासून ही सेवा बंद होती. परंतु, भारताने आता कॅनेडियन नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरू केली आहे. त्यामुळे भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांमधील संबंध सुधारत असल्याचं दिसू लागलं आहे. यावर भारताचे परराष्ट्रंत्री एस. जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एस. जयशंकर म्हणाले, भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांमधील संबंध तुलनेने सुधारले आहेत. त्यामुळे भारताने कॅनेडियन नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरू केली आहे. जी-२० नेत्यांची दृकश्राव्य माध्यमातून परिषद संपन्न झाली. या परिषदेनंतर जयशंकर आंनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांच्याबरोबर अर्थमंत्री निर्मला सीतारमण देखील उपस्थित होत्या.
यावेळी जयशंकर म्हणाले, आपण कॅनेडियन नागरिकांना व्हिसा देण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली होती. कारण, कॅनडातील परिस्थितीमुळे आपल्या तिथल्या अधिकाऱ्यांना कार्यालयात जाणे आणि व्हिसा प्रक्रियेसह इतर आवश्यक कामे करणे कठीण झाले होते. परंतु आता तिथली परिस्थिती तुलनेने सुरक्षित आणि चांगली झाली आहे. त्यामुळेच आपण त्यांच्यासाठी ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरू केली आहे.
व्हिसा प्रक्रिया स्थगित का केली होती?
कॅनडातील उच्चायुक्तालय आणि वाणिज्य दूतावासांना ‘सुरक्षाविषयक धोका’ असल्याचे सांगत कॅनडाच्या नागरिकांना भारताचा व्हिसा देणे तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याचे भारताच्या परराष्ट्र खात्याने २१ सप्टेंबर रोजी जाहीर केले होते. हा निर्णय जाहीर करायच्या एक दिवस आधी म्हणजेच २० सप्टेंबर रोजी भारताने कॅनडात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले होते. कॅनडामधील भारतविरोधी वाढत्या कारवाया, तसेच राजनैतिक तणाव लक्षात घेता भारताने हा इशारा दिला होता. त्यानंतर कॅनेडियन नागरिकांसाठी व्हिसा देणे बंद केले होते. आता भारताने कॅनेडियन नागरिकांसाठी इलेक्ट्रॉनिक व्हिसा सेवा सुरू केली आहे.