S Jaishankar on Terrorism : केंद्र सरकार दहशतवादाविरोधात सातत्याने कठोर भूमिका घेताना दिसतंय. २०१६ मधील सर्जिकल स्ट्राईक आणि २०१९ मधील बालाकोट एअरस्ट्राईक ही त्याचीच काही उदाहरणं आहेत. दरम्यान, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दहशतवादाविरोधात केल्या जाणाऱ्या कारवाईबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. जयशंकर म्हणाले, दहशतवाद्यांचा संपवताना कुठलेही नियम पाळले जाणार नाहीत. कारण दहशतवादी कुठल्याही प्रकारचे नियम मानत नाहीत. २०१४ नंतर भारताचं परराष्ट्र धोरण बदललं आहे. आपलं नवं परराष्ट्र धोरण दहशतवादाविरोधात लढण्यासाठी पुरेसं आणि योग्य आहे. दहशतवादी जर कुठल्याही प्रकारचे नियम पाळत नसतील तर त्यांच्यावर पलटवार करताना आपण तरी नियम कशाला पाळायचे?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एस. जयशंकर म्हणाले, दहशतवादाविरोधातील कारवाईदरम्यान कुठल्याही प्रकारच्या नियमांचं पालन केलं जाणार नाही. आपण त्या नियमांच्या फंदात न पडलेलं बरं. दिसतील तिथे दहशतवाद्यांना ठार केलं पाहिजे. संधी मिळताच त्यांना संपवलं पाहिजे. दरम्यान, एस. जयशंकर यांना प्रश्न विचारण्यात आला की, भारताला कोणत्या देशांबरोबर राजकीय संबंध निर्माण करताना जास्त समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. यावर पाकिस्तानचं नाव न घेता जयशंकर म्हणाले तो देश आपल्या शेजारी असून त्याला आपणच जबाबदार आहोत.

१९४७ मध्ये पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केला होता. भारतीय सैन्याने त्यांना जशास तसं उत्तर दिलं. त्यानंतर त्या राज्याचं भारतात विलीनिकरण करण्यात आलं. भारतीय सैन्य त्यांच्या पद्धतीने कारवाई करत होतं. ही कारवाई चालू असतानाच आपण थांबलो आणि संयुक्त राष्ट्रांत धाव घेतली. त्यावेळी संयुक्त राष्ट्रांत केलेल्या तक्रारीत आपण त्या हल्लेखोरांचा उल्लेख दहशतवादी करण्याऐवजी घुसखोर असा केला. आपल्या या सगळ्या भूमिकांमुळे आपलंच नुकसान झालं.

हे ही वाचा >> काँग्रेसच्या तिकीटासाठी महिलेने दिला उपजिल्हाधिकारी पदाचा राजीनामा; पक्षाने नाकारली उमेदवारी, आता…

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले आपण आधीच स्पष्ट करायला हवं होतं की, पाकिस्तान दहशतवादाचा वापर करतोय. तसं केलं असतं तर आपली धोरणं बदलली असती. संयुक्त राष्ट्रांनीही ती समस्या वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिली असती. जयशंकर यांनी यावेळी स्पष्ट केलं की आपला देश दहशतवादाच्या विरोधात कारवाया करत राहील.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: S jaishankar says terrorists dont follow rules so our response cant have rules dealing with pakistan asc