Anti-armor weapon system AT4 In Indian Army : येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या एरो इंडिया २०२५ च्या पूर्वी स्वीडिश डिफेन्स कंपनी साबने भारतीय सशस्त्र दलांना त्यांच्या नवीन पिढीच्या, अँटी-आर्मर वेपन सिस्टम AT4 ची डिलिव्हरी पूर्ण केली आहे, याबाबत कंपनीने माहिती दिली. भारतीय हवाई दलही याचा वापर करणार आहे. २०२२ मध्ये, स्वीडिश डिफेन्स कंपनीला भारतीय सैन्याने पूर्णपणे डिस्पोजेबल, हलके, मॅन-पोर्टेबल आणि अनगाइडेड रॉकेट लाँचर सिस्टमसाठी कंत्राट दिले होते.
दरम्यान, साब डिफेन्स कंपनी पुढील वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या हरियाणा प्लँटमध्ये कार्ल-गुस्ताफ या रिकॉइललेस शोल्डर-फायर्ड वेपन सिस्टमचे उत्पादन सुरू करेल अशी आशा आहे. संरक्षण क्षेत्रातील हा पहिलाच प्रकल्प आहे, ज्यामध्ये १०० टक्के थेट परकीय गुंतवणूक आहे. याबाबत द प्रिंटने वृत्त दिले आहे.
कार्ल गुस्ताफ एम-४ शस्त्र प्रणाली
कार्ल गुस्ताफ एम-४ शस्त्र प्रणाली, हे एक हाताने पकडता येणारा रॉकेट लाँचर आहे जे सैनिक खांद्यावर ठेवून लाँच करू शकतात. हे रॉकेट ४०० मीटर अंतरापर्यंतचे लक्ष्य नष्ट करू शकते. साब या कारखान्यात सुमारे ५०० कोटी रुपये गुंतवत आहे. कंपनीने अलीकडेच लष्कराला ८४ एम-४ शस्त्र प्रणाली पुरवल्या होत्या.
“आम्ही AT4 ची डिलिव्हरी पूर्ण केली आहे. आमच्या हरियाणा प्लँटमध्ये कार्ल गुस्ताफ शस्त्रावर काम सुरू आहे आणि आम्ही आता औद्योगिक परवान्याची वाट पाहत आहोत. पुढील वर्षाच्या सुरुवातीला याचे उत्पादन सुरू होईल अशी आम्हाला आशा आहे,” असे साब इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मॅट्स पामबर्ग यांनी नवी दिल्ली येथे सांगितले.
बेंगळुरूमध्ये संरक्षण उत्पादनांचे प्रदर्शन
बेंगळुरू येथे होणाऱ्या एअर शोमध्ये साब डिफेन्स कंपनी आपली संरक्षण उत्पादने प्रदर्शित करणार आहे, असे साबचे व्यवस्थापकीय संचालक मॅट्स पामबर्ग यांनी गुरुवारी सांगितले. ग्रिपेन या लढाऊ विमानाचे कॉकपिट सिम्युलेटर देखील येथे प्रदर्शित केले जाणार. याशिवाय, हवाई दल, नौदल आणि लष्करासाठी महत्त्वाची असलेली सुमारे डझनभर शस्त्रे प्रदर्शित केली जातील.