तुम्ही पाळीच्या रक्ताने भरलेल्या नॅपकिनसह मित्राच्या घरी प्रवेश कराल का?, असा प्रश्न विचारणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. स्मृती इराणींविरोधात बिहारमधील सीतामढी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. स्मृती इराणींनी महिलांचा अपमान केल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.

शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशासंदर्भात स्मृती इराणी यांना नुकताच एका कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला होता. राज्यघटनेनुसार सर्वांना धर्माचरणाचा अधिकार असला तरी त्याचा अर्थ कोणाला देवदेवतांच्या पावित्र्यभंगाचा किंवा विटंबनेचा अधिकार दिलेला नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. मी मंत्री असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बोलण्याचा अधिकार मला नाही. पण तुम्ही तरी मासिक पाळीच्या रक्ताने भरलेल्या नॅपकिनसह मित्राच्या घरी प्रवेश कराल का?, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. या विधानामुळे स्मृती इराणी यांच्यावर टीकेची झोड उठली होती.

या विधानामुळे स्मृती इराणी यांच्या अडचणीत भर पडली आहे. बिहारच्या सीतामढी येथील न्यायालयात स्मृती इराणींविरोधात याचिका दाखल झाली आहे. जिल्हा सत्र न्यायालयात ही याचिका दाखल झाली आहे. स्मृती इराणींनी महिलांचा अपमान केला असून प्रवेशास विरोध दर्शवूनत त्यांनी महिलांच्या अधिकाराविरोधात त्यांनी हे विधान केले आहे, असे यात म्हटले आहे. सरोज कुमारी या महिलेने वकील ठाकूर चंदन सिंह यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे.

फौजदारी कट, देशद्रोह, सरकारी कामात अडथळा आणणे आणि महिलांचा अपमान करणे, या कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर २९ ऑक्टोबर रोजी सुनावणी आहे.

Story img Loader