दोन महिलांनी शबरीमला मंदिर प्रवेशबंदीची शेकडो वर्षांची परंपरा मोडीत काढत अयप्पाचे दर्शन घेतल्याची ऐतिहासिक घटना बुधवारी घडली असतानाच गुरुवारी देखील श्रीलंकेतून आलेल्या एका महिलेने शबरीमला मंदिरात प्रवेश केल्याचे समोर आले आहे. शशीकला (वय 46) असे या महिलेचे नाव असून रात्री 11 वाजता त्या मंदिरातून सुखरुप परत आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

शबरीमला मंदिरात १० ते ५० या वयोगटातील महिलांवरील प्रवेशबंदी उठवण्याचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने तीन महिन्यांपूर्वी दिला होता. मात्र, कडव्या हिंदू संघटनांच्या विरोधामुळे याची अंमलबजावणी करता येत नव्हती. हिंदुत्ववादी संघटनांच्या धमक्यांना न जुमानता बुधवारी दोन महिलांनी अयप्पा दर्शनाचा अधिकार बजावला. या ऐतिहासिक घटनेनंतर गुरुवारी केरळमध्ये बंदची हाक देण्यात आली होती. शबरीमला कर्म समिती व आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेने बंदची हाक दिली होती. या बंदला हिंसक वळण लागले होते. यात भाजपाचे तीन कार्यकर्तेही जखमी झाले.

केरळमध्ये बंदमुळे तणाव निर्माण झाला असतानाच दुसरीकडे गुरुवारी रात्री श्रीलंकेतून आलेल्या शशीकला कुमारन या महिलेने देखील शबरीमला मंदिरात जाऊन अयप्पाचे दर्शन घेतले. रात्री साडे नऊच्या सुमारास महिलेने अयप्पाचे दर्शन घेतले आणि 11 वाजता महिलेला सुरक्षित बाहेर नेण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

शशीकला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दर्शनाची वेळ आधीच निवडली होती. यानुसार गुरुवारी रात्री त्यांनी दर्शन घेतले. शशीकला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी साध्या वेशातील पोलिसांचे सुरक्षा कवचही देण्यात आले होते, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

श्रीलंकेच्या महिलेने मंदिरात अयप्पाचे दर्शन घेतले असले तरी शबरीमला कर्म समितीच्या कार्यकर्त्यांनी दीपा नामक महिलेला मंदिरात प्रवेश घेण्यापासून रोखले. शबरीमला मंदिराच्या दिशेने जात असतानाच कार्यकर्त्यांनी त्यांना अडवले आणि शेवटी दीपा यांना माघारी परतावे लागल्याचे वृत्त आहे.

Story img Loader