जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे कौतुक केले असल्याकडे राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधले आहे. तसेच ‘अनिर्णित’ स्थिती संपवण्याचे आवाहनही पायलट यांनी केले.

सप्टेंबरमध्ये गेहलोत समर्थक आमदारांनी विधीमंडळ पक्षाच्या बैठकीकडे पाठ फिरवून उघड बंडाचा झेंडा फडकवला होता. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून गेहलोत यांना माघार घ्यावी लागल्यानंतर पायलट शांत होते. मात्र बुधवारी आपले मौन सोडत त्यांनी गेहलोत आणि त्यांच्या समर्थकांवर तोफ डागली. ‘‘पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक करणे ही रंजक घडामोड आहे. याच पद्धतीने पंतप्रधानांनी संसदेमध्ये गुलाम नबी आझाद यांचेही कौतुक केले होते आणि त्यानंतर काय झाले, हे आपल्या सर्वासमोर आहे,’’ असे पायटल म्हणाले. त्यामुळे ही घटना हलक्यात घेतली जाऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सप्टेंबरमधील घटनांनंतर तीन गेहलोत समर्थकांना बजावण्यात आलेल्या नोटिशीवर पुढे कारवाई केली जावी, अशी मागणीही त्यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्याकडे केली.

हेही वाचा >>> “वेडात मराठे वीर दौडले चाळीस”; राज ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर मिश्कील टिप्पणी

पक्षशिस्त पाळा – गेहलोत

पायलट यांच्या पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना याबाबत प्रश्न विचरला असता ‘पक्षशिस्त पाळा आणि माध्यमांमध्ये विधाने करणे टाळा’, असा सल्ला पक्षनेत्यांना दिला. आता केवळ विधानसभा निवडणूक जिंकण्यावरच लक्ष केंद्रित केले जावे, असे ते म्हणाले.

विधानसभा निवडणुकीला अवघे १३ महिने शिल्लक आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने लवकरच कोणतातरी निर्णय घ्यायला हवा. विधीमंडळ पक्षाची बैठक पुन्हा बोलावली जाऊ शकते.

सचिन पायलट, माजी उपमुख्यमंत्री, राजस्थान