पीटीआय, नवी दिल्ली
राजस्थानमधील काँग्रेस पक्षांतर्गत वादाचा विपरित परिणाम भारत जोडो यात्रेवर होण्याची शक्यता काँग्रेस नेते आणि राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी रविवारी फेटाळली. राजस्थानमध्ये काँग्रेसमध्ये भक्कम एकजूट आहे. तसेच भारत जोडो यात्रेस इतर राज्यांपेक्षा अधिक प्रतिसाद लाभून, ती राजस्थानात अधिक यशस्वी करण्यावर लक्ष केंद्रित केले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राजस्थानमध्ये रविवारी भारत जोडो यात्रेने प्रवेश केला.
पायलट यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी असलेल्या आपल्या मतभेदांवरून काँग्रेसला लक्ष्य केल्याबद्दल भाजपवरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी किमान डझनभर दावेदार आहेत. त्यामुळे भाजप जेव्हा अशी टीका करते तेव्हा गंमत वाटते. भाजपमध्ये खूप मतभेद आहेत. राजस्थानमध्ये गेल्या चार वर्षांत एक समर्थ विरोधी पक्ष हे स्थान मिळवण्यातही भाजपला अपयश आले आहे.
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री गेहलोत यांनी पायलट यांच्यावर टीकास्त्र सोडल्यानंतर राजस्थानमधील काँग्रेसच्या यात्रेचे भवितव्य अनिश्चित झाले होते. याबाबत विचारले असता पायलट म्हणाले, की याबाबत प्रसारमाध्यमांनी काल्पनिक वृत्तांकन केले. ‘भारत जोडो’बाबतची शंका त्यांनी या वेळी फेटाळली. पक्षात एकोपा असून, भारत जोडो यात्रा यशस्वी करण्यासाठी आम्ही एकजुटीने काम करत आहेत. अ, ब, क व्यक्ती म्हणून नव्हे तर एक पक्ष म्हणून आम्ही सरकार स्थापण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत आणि आता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील यात्रेमुळे राजस्थानात वर्षभराने होणाऱ्या आगामी निवडणुकीच्या दिशेने पक्षाची दमदार पावले पडतील.
काँग्रेसचे सरचिटणीस आणि पक्ष संघटनेचे प्रभारी के. सी. वेणुगोपाल गेल्या आठवडय़ात जयपूरमध्ये होते, याकडे लक्ष वेधून पायलट म्हणाले, की भारत जोडो यात्रेच्या विविध पैलूंवर या वेळी दीर्घ चर्चा झाली. सर्व कार्यकर्त्यांना सक्रिय करून, त्यात लाखो नागरिक कसे सहभागी होतील, याबाबत विचारविनिमय झाला. त्यामुळे यात्रेबाबत कोणत्याही प्रकारची शंका बाळगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे पक्षांतर्गत वादावर माध्यमांतून कथा पेरल्या जात आहेत. काल्पनिक वादनिर्मितीचा प्रयत्न केला जात आहे. ही यात्रा राजस्थानमध्ये प्रवेश करून तिची यशस्वीपणे सांगता होईपर्यंत आम्ही त्यावर आमचे संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. या यात्रेला मिळालेल्या भव्य प्रतिसादाने तिची आठवण जनतेच्या मनात वर्षांनुवर्षे राहील व आगामी पिढय़ांनाही या आठवणी सांगितल्या जातील, या दिशेने आम्ही प्रयत्न करत आहोत.