गेल्या वर्षी २०२० मध्ये पंजाब काँग्रेसमध्ये घडलेल्या अनेक नाट्यमय घडामोडींचा फटका पंजाबला या निवडणुकीत बसला आणि राज्यातली सत्ता पक्षाला गमवावी लागली. यामध्ये नवज्योत सिंग सिद्धू हे केंद्रस्थानी राहिले होते. त्यापाठोपाठ आता पंजाबप्रमाणेच राजस्थानमध्ये देखील राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे काँग्रेससमोर राजस्थानमध्ये देखील मोठा पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो. या सगळ्याला कारणीभूत ठरली आहे ती काँग्रेसचे राजस्थानमधील नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी घेतलेली आक्रमक भूमिका.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सचिन पायलट यांची ‘ती’ बंडखोरी!

दोन वर्षांपूर्वी सचिन पायलट यांनी राजस्थानमधील नेतृत्वाबद्दल नाराजी व्यक्त करत केलेली बंंडखोरी सर्वश्रुत आहेच. मात्र, त्यानंतर त्यांचा राग निवळला आणि ते पक्षातच राहिले. पण यादरम्यान सचिन पायलट यांची पक्षानं राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी केली. शिवाय राज्याच्या अध्यक्षपदावरून देखील त्यांना पायउतार व्हावं लागलं. यानंतर आता पुन्हा एकदा सचिन पायलट यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. एनडीटीव्हीनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

सचिन पायलट यांना हवंय राजस्थानचं मुख्यमंत्रीपद!

या वृत्तानुसार, सचिन पायलट यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. आपल्याला तातडीने राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी नेमण्यात यावं, अशी मागणी सचिन पायलट यांनी केली आहे. राजस्थानमध्ये पुढील वर्षी अर्थात २०२३मध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये पक्षाला चांगली कामगिरी करायची असेल, तर आपल्याला तातडीने राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्त करावं, असं पायलट सोनिया गांधींना म्हणाले आहेत.

“जर पक्षानं थोडा जरी उशीर केला…”

दरम्यान, सचिन पायलट यांनी पक्षाला सूचक इशारा देखील दिल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. “मला राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी बसून २०२३मध्ये पक्षाची सत्ता पुन्हा एकदा राज्यात आणण्यासाठी काम करायचं आहे. जर काँग्रेसनं योग्य निर्णय घेण्यासाठी उशीर केला, तर पंजाबप्रमाणेच राजस्थान देखील काँग्रेसच्या हातून जाईल”, असं सचिन पायलट यांनी सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेऊन सांगितल्याचं म्हटलं जात आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये सचिन पायलट यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची तीन वेळा भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे,. या भेटींदरम्यान, राजस्थानमधील सत्ता राखण्यासंदर्भात कोणत्या पद्धतीने काम करावं लागेल, याबाबत चर्चा झाल्याचं देखील समोर येत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin pilot ultimatum to congress asks rajasthan cm post sonia gandhi pmw