ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांनी मैदानावर कमाल दाखविली आणि या मालिकेमध्ये भारताने ३-० ने आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू टीम इंडियाच्या फिरकीपुढे निष्प्रभ ठरले. मैदानावरील कामगिरीत गोलंदाज यशस्वी ठरले असले, तरी मैदानाबाहेर क्रिकेटचाहत्यांमध्ये सध्याही सर्वाधिक चर्चा आहे ती मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याचीच. देशातील तरुणांचे स्पंदन बनलेल्या विविध सोशल नेटवर्किंग साईट्सवर सचिन तेडुलकरच सर्वाधिक चर्चेतील व्यक्तिमत्त्व असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तिन्ही कसोटी सामन्यांच्या काळात सोशल नेटवर्किंग साईट्सवर सचिनच सर्वाधिक चर्चेत राहिला, असा निष्कर्ष ‘आयबीएम’ने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आलाय. सचिनच्या फलंदाजीबद्दल सोशल नेटवर्किंग साईट्सवरील सुमारे ५० टक्के युजर्स चर्चा करीत होते. त्यानंतर त्याचे आतापर्यंतचे विक्रम, त्याची संभाव्य निवृत्ती याबद्दल युजर्सनी चर्चा केली.
तेंडुलकरनंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याबद्दल सर्वाधिक युजर्सनी चर्चा केली. मुरली विजयने दोन सामन्यांमध्ये केलेली शतके आणि रविंद्र जडेजाने अचूक टप्प्यावर चेंडू टाकत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची उडवलेली भंबेरी यावरही या साईट्सवर चर्चा झडल्याचे सर्वेक्षणात आढळून आले.
मालिकेच्या सुरुवातीला धोनीला कर्णधारपदी ठेवल्याबद्दल अनेकांनी आक्षेप नोंदविला होता. मात्र, पहिल्या सामन्यातील त्याच्या खेळीमुळे आणि नंतर दोन्ही सामन्यातील भारताच्या विजयामुळे क्रिकेटप्रेमी त्याच्याकडे सकारात्मकपणे बघू लागल्याचे आढळले.
शिखर धवनने कसोटी पदार्पणाच्या सामन्यातच शतक ठोकल्यानंतर त्याच्याविषयी सोशल नेटवर्किंग साईट्सवरील चर्चेमध्ये तब्बल २०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे सर्वेक्षणात दिसून आले.

Story img Loader