क्रिकेट रसिकांचा लाडका सचिन तेंडुलकर व ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ सी.एन.आर. राव यांना मंगळवारी एका दिमाखदार कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी किताब बहाल करण्यात आला. ‘भारतरत्न’ने गौरविण्यात आलेला सचिन हा देशातली पहिला क्रीडापटू आहे.
पंतप्रधान मनमोहन सिंग, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, अनेक मंत्री, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी तसेच सचिनची पत्नी अंजली, मुलगी सारा व अनेक मान्यवर उपस्थित होते. राव यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून सध्या ते पंतप्रधानांच्या विज्ञान सल्लागार समितीचे प्रमुख आहेत.
४० वर्षीय सचिनने १६ नोव्हेंबरला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळत क्रिकेटला अलविदा केला. याच दिवशी सचिनला भारतरत्न जाहीर करण्यात आला होता. कसोटी तसेच एकदिवसीय क्रिकेटमधील अनेक विक्रम नावावर असलेल्या सचिन तेंडुलकरची कारकीर्द २४ वर्षांची आहे. तेंडुलकर व राव या दोघांनाही यापूर्वी पद्मविभूषणने गौरवण्यात आले होते. १९५४ पासून ज्या ४१ जणांना विशेष कामगिरीसाठी भारतरत्न दिले त्यात आता या दोघांचा समावेश झाला आहे. चार वर्षांनंतर भारतरत्न सन्मान देण्यात आला असून यापूर्वी २००९ मध्ये तो भीमसेन जोशी यांना देण्यात आला होता. पहिले भारतरत्न समाजसुधारक व भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांना १९५४ मध्ये मिळाले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा