मुंबई : मुंबईवर २६/११ च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला पुण्यातील येरवडा तुरुंगात २१ नोव्हेंबर, २०१२ फासावर चढवण्यात आले. आर्थर रोडवरून कसाबला पुण्यातील येरवडा तुरुंगात फाशी देण्यासाठी मोहिम राबवण्यात आली होती. या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्त्व त्यावेळी पोलीस अधिकारी सदानंद दाते केले होते. त्याच सदानंद दातेंच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रीय तपास यंत्रणेने(एनआयए) तहव्वूर राणाला अमेरिकेतून प्रत्यार्पण करून भारतात आणले आहे.

एनआयएचे महासंचालक असलेले दाते मुंबई हल्ल्यात दहशवाद्यांशी दोन हात करताना जखमी झाले होते. पण त्यांनी अनेकांचे जीव वाचवला होता. राष्ट्रपतींकडून कसाबची दयायाचना नऊ नोव्हेंबर २०१२ रोजी फेटाळण्यात आल्यानंतर १२ नोब्हेंबर २०१२ रोजी सत्र न्यायालयाने कसाबचे मृत्यू वॉरंट काढण्यात आले.

वरिष्ठ अधिका-यांच्या बैठकीनंतर मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी या संपूर्ण मोहिमेची जबाबदारी त्यावेळचे सहपोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सदानंद दाते यांच्यावर सोपवण्याचा निर्णय घेतला होता.

तत्पूर्वी त्यांनी तपास अधिकारी रमेश महाले यांना त्यांच्या कार्यालयात बोलावून कसाबबाबत राबवण्यात येणाऱ्या मोहिमेची तयारी करण्यास सांगितले. त्यानुसार १९ नोव्हेंबर १०१२ ला महालेंना दाते यांनी त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले. त्यानुसार सहा गाडया तयार करण्यात आल्या होत्या.

त्यातील एका मोटरगाडीत बसून रमेश महाले व तत्कालीन कारागृह अधिकारी विनोद लोखंडे थेट आर्थर रोड तुरुंगाच्या यार्ड क्रमांक १२च्या खाली गेले. त्या वेळी कसाबच्या विशेष सेलमध्ये जाऊन महालेंनी कसाबला विचारले, क्या कसाब पहचाना क्या? त्यावर कसाबने ह्यह्णमहाले साहेबह्णह्ण असे उत्तर दिले. नंतर मध्यरात्री १२ वाजून १५ मिनिटांनी कसाबला वाहनात बसवून त्याच्या तोंडावर बुरखा घालण्यात आला. मग कसाबला येरवडयात घेऊन जाणा-या ताफ्यातील प्रवासावर सदानंद दाते लक्ष ठेऊन होते.

या संपूर्ण प्रवासातील सहा टप्प्यांना इंग्रजीच्या बाराखडीनुसार ए ते एफ पर्यंत सांकेतिक नावे देण्यात आली होती. उदा. अल्फा (आर्थर रोड), येरवडा (फॉक्स). सर्व संवाद हे फोर्सवनच्या बिनतारी संचावरून केले जात होते. प्रत्येक टप्प्यानुसार बिनतारी संदेश देणारा केवळ सांकेतिक शब्द म्हणजेच अल्फा उच्चारायचा. त्यानुसार कसाब कुठे पोहोचला याची माहिती दाते यांना मिळत होती. ही संपूर्ण मोहिम अत्यंत गुप्ततेने राबवण्यात आली. २० नोव्हेंबर २०१२च्या पहाटे हा फौजफाटा कसाबला घेऊन येरवड्याला पोहोचला. २१ नोव्हेंबर २०१२ ला कसाबला फासावर चढवण्यात आले. कसाबला फासावर चढवण्याच्या या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्त्व करणारे सदानंद दाते आता एनआयएच्या महासंचालक पदी कार्यरत आहेत.

मुंबई हल्ल्यात प्राण वाचवले

मुंबई हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी डॉक्टर व रुग्णांना ओलीस ठेवल्याची माहिती मिळाली होती. त्यावेळी दाते एक पथकासह कामा रुग्णालयात पोहोचले. त्यावेळी दाते यांनी दहशवाद्यांच्या अद्यायावत एके-४७ चा सामना केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. मात्र त्यांनी रुग्णालयातील अनेक कर्मचारी आणि रुग्णांचे जीव वाचवले. त्यावेळी परळ येथील केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. त्यावेळी नागरिकांनी रुग्णालयाबाहेर दाते यांच्या नावाचा जयघोष केला होता. सदानंद दाते यांना त्यांच्या या कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले होते.