रेल्वेतील सुरक्षितता, सुविधा, स्वच्छता आणि तंत्रज्ञांनाचा परिणामकारक वापर यावर भर देणारा चालू आर्थिक वर्षासाठीचा रेल्वे अर्थसंकल्प रेल्वेमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी मंगळवारी संसदेत मांडला. तब्बल २६ हजार कोटींच्या आर्थिक तुटवड्यासह धावत असलेल्या रेल्वेला लोकप्रिय घोषणा आता परवडणार नाहीत, हे स्पष्ट झाल्याने आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच सदानंद गौडा यांनी नवीन प्रकल्प किंवा रेल्वेमार्ग जाहीर करून मला आत्ता टाळ्या मिळतील, पण रेल्वेचे त्यामुळे नुकसानच होईल, हे स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारचा हा पहिलाच रेल्वे अर्थसंकल्प. अर्थसंकल्प मांडण्यापूर्वीच गेल्या महिन्यात रेल्वेच्या प्रवासी आणि मालवाहतुकीच्या भाड्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय रेल्वेमंत्र्यांनी घेतला. त्यामुळे या अर्थसंकल्पात आणखी भाडेवाढ होण्याची शक्यता नव्हतीच. रेल्वेमंत्री नव्या घोषणांवर भर देतात की रेल्वेची विस्कटलेली आर्थिक घडी रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करतात, याकडेच सगळ्यांचे लक्ष होते. त्यापैकी रेल्वेमंत्र्यांनी लोकप्रिय घोषणांपेक्षा आर्थिक स्थिती सुधारण्याला प्राधान्य दिल्याचे दिसते.
रेल्वेची आर्थिक परिस्थिती बिघडण्याला मागील यूपीए सरकार कसे कारणीभूत होते, याचे आकडेवारीसहीत उदाहरणच रेल्वेमंत्र्यांनी आपल्या भाषणात दिले. प्रतिप्रवासी/प्रतिकिलोमीटर रेल्वेच्या नुकसानीत २०००-०१ मधील १० पैशांवरून २०१२-१३ मध्ये २३ पैशांपर्यंत वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. केवळ नव्या रेल्वेमार्गांची घोषणा मागील दहा वर्षांत झाली. परंतु, त्यापैकी अत्यल्प पूर्णत्वास गेल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सुरक्षितता, स्वच्छता आणि सुविधा या त्रिसूत्रींवर आपला भर राहणार असल्याचे सदानंद गौडा यांनी स्पष्ट केले. त्यासाठी विविध नव्या उपाययोजनांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. रेल्वेतील आणि रेल्वेस्थानकांवरील स्वच्छता सुधारण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीत गेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत ४० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. निवडक रेल्वे स्थानकांवर यापुढे ‘आरओ’ आधारित शुद्ध पेयजल उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचबरोबर निवडक रेल्वे गाड्यांमध्ये ‘प्री कुक्ड रेडी टू इट’ पदार्थ उपलब्ध करून देण्यात येतील. रेल्वेमध्ये पुरविण्यात येणाऱया पदार्थांमध्ये स्वच्छता न बाळगल्यास संबंधित कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्याची तरतूदही करण्यात आली असल्याचे सदानंद गौडा यांनी सांगितले. सर्व रेल्वेस्थानकांवर स्वयंचलित जिने उभारणे, निवडक रेल्वेंमध्ये संगणक सुविधा उपलब्ध करून देणे यासह रेल्वेस्थानकांवर आणि रेल्वेगाड्यांमध्ये वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. मिनिटाला ७२०० तिकीटे आरक्षित करता यावीत, यासाठी आरक्षण सुविधा अद्ययावत करणे, टपाल कार्यालयात रेल्वेची तिकीटे उपलब्ध करून देणे, अशाही सुविधा देण्याचे सदानंद गौडा यांनी सांगितले.
भाडेवाढी व्यतिरिक्त इतर पर्यांयांचा वापर
रेल्वेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केवळ प्रवाशांवरच सर्व भार टाकण्यात येणार नसल्याचेही सदानंद गौडा यांनी स्पष्ट केले. नुकत्याच केलेल्या भाडेवाढीमुळे रेल्वेला आठ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. भाडेवाढीव्यतिरिक्त थेट परदेशी गुंतवणूक, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आणि इतर मार्गांनीही रेल्वेच्या तिजोरीत कशी भर पडेल, याकडेही लक्ष देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
तंत्रज्ञानावर भर
पुढील पाच वर्षांत रेल्वेचा कारभार ‘पेपरलेस’ करण्यावर आपला भर राहील, असे सांगून सदानंद गौडा म्हणाले, तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रेल्वेच्या हितासाठी नवनवीन कल्पना पुढे याव्यात, यासाठी ‘इनोव्हेशन सेंटर’ सुरू करण्यात येईल. रेल्वेस्थानकांवर आरक्षणाची डिजिटल स्वरुपातील यादी उपलब्ध करून दिली जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा