Tahawwur Rana Extradition: मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला गुरुवारी अमेरिकेतून भारतात आणण्यात आले. राणाला एका खास विमानाने दिल्लीला आणण्यात आले आहे. यानंतर २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर हुसेन राणाला दिल्लीच्या पालम विमानतळावर औपचारिकरित्या अटक करण्यात आल्याची माहिती एनआयएने दिली आहे. दरम्यान मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील पीडितांमध्ये राणाला भारतात आणल्यामुळे अखेर न्याय मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. या हल्ल्यातून बचावलेल्या एका पीडिताने अजमल कसाबच्या खटल्याइतका हा खटला न चालवता राणाला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
मूळचे कोल्हापूरचे आणि अनेक वर्षांपासून मुंबईत फिरते अन्नपदार्थ विक्रेते म्हणून काम करणारे सदाशिव कोळके, २६/११ दहशतवादी हल्ल्यातील पीडित आहेत. या हल्ल्यादरम्यान कोळके यांच्या मानेवर गोळी लागली होती. दरम्यान कोळके यांनी तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर त्याला लवकरात लवकर फाशी द्यावी अशी मागणी केली आहे. याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.
हा खटला काही महिन्यांत…
या प्रकरणावर बोलताना सदाशिव कोळके म्हणाले की, “आपल्यावर अन्याय करणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पण या राणाला कसाबला चार वर्षे ठेवण्यात आले होते, तितके दिवस ठेवू नये. हा खटला काही महिन्यांत संपला पाहिजे आणि त्याला लवकरात लवकर फाशी देण्यात यायला पाहिजे,” असे कोळके म्हणाले.
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्याने झाडलेली गोळी सदाशिव कोळके यांच्या मानेला लागली होती. त्यानंतर त्यांच्यावर जेजे रुग्णालयात सुमारे दीड महिना उपचार सुरू होते. उपचारानंतर ते त्यांच्या मूळ गावी कोल्हापूरला गेले होते. ते सुमारे दोन वर्षे तिथेच राहिले, परंतु त्यांच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना कोल्हापूरहून पुन्हा मुंबईला यावे लागले. याबाबतही इंडिया टुडेच्या वृत्ताच उल्लेख करण्यात आला आहे.
तहव्वूर राणाचा खटला कोण लढवणार?
तहव्वूर राणा हा पाकिस्तानी-कॅनेडियन नागरिक आहे जो अमेरिकेत राहत होता. अमेरिकेच्या सुरक्षा दलांनी त्याला विविध दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असल्याबाबत दोषी ठरवले होते. दरम्यान तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर इथे त्याचा खटला कोण लढणार, असे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहेत. आता एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार तहव्वूर राणाचा खटला दिल्ली कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे वकील पीयूष सचदेवा लढवणार आहेत. ते न्यायालयात तहव्वुर हुसेन राणा याचे प्रतिनिधित्व करतील.