उत्तर प्रदेशमध्ये ३४ वर्षीय सद्दाम नामक इसमाने लग्न करण्यासाठी हिंदू धर्म स्वीकारला असल्याची माहिती समोर येत आहे. सद्दामचे त्याच्या गावातील एका महिलेशी १० वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र सद्दामच्या घरच्यांनी लग्नाला विरोध केल्यानंतर तो लग्नासाठी टाळाटाळ करत होता. अखेर महिलेने सद्दाम विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात सद्दाम आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात बलात्कार, गर्भपातासाठी बळजबरी, लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली. तीन दिवसानंतर सद्दामने धर्म बदलत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोघांनीही स्वेइच्छेने लग्न केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्दाम हुसैन हा उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातील नगर बाझार येथील रहिवासी आहे. याच गावातील एक महिलेशी (वय ३०) त्याचे १० वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांचाही धर्म वेगवेगळा असल्यामुळे सद्दामचे कुटुंबिय लग्नासाठी तयार नव्हते. महिला मात्र लग्नासाठी वारंवार दबाव टाकत होती.
सद्दामच्या कुटुंबाचा विरोध पाहून सदर महिलेने तीन दिवसांपूर्वी बस्ती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार करत सद्दाम विरोधात बलात्कार आणि गर्भपाताची तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली. जिल्हा अधीक्षकांनी आदेश दिल्यानंतर पोलिसांनी सद्दाम हुसैन आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला, अशी माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रमुख देवेंद्र सिंह यांनी पीटीआयला दिली.
रविवारी रात्री सद्दाम आणि तक्रारदार महिलेने गावातील एका मंदिरात हिंदू विधीप्रमाणे लग्न केले. तसेच सद्दामने स्वतःचे नाव बदलून शिवशंकर सोनी असे नवे नाव ठेवले. दोघांनीही सात फेरे घेत हिंदू चालीरीतीप्रमाणे विवाबद्ध होण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी पोलिसांना प्रेमसंबंधाची कल्पना दिली आणि स्वेच्छेने लग्न करत असल्याचेही सांगितले.