Sadhguru Jaggi Vasudev vs Madras High Court : ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यावर एका व्यक्तीने आरोप केला आहे की ते महिलांना संन्यासी होण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. याप्रकरणी एका निवृत्त प्राध्यापकाने मद्रास उच्च न्यायालयात जग्गी वासुदेव यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सोमवारी (३० सप्टेंबर) सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने जग्गी वासूदेव यांच्या वकिलांना प्रश्न विचारला की “जग्गी वासुदेव यांनी स्वतःच्या मुलीचं लग्न लावून दिलेलं असताना ते इतर तरुणींना संसाराचा त्याग करून, केशवपन करून संन्याशांसारखं जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन का देत आहेत?” न्यायमूर्ती एस. एम. सुब्रह्मण्यम व व्ही. शिवाग्ननम यांनी जग्गी वासूदेव यांच्या कारभारावर बोट ठेवलं. जग्गी वासूदेव यांच्याविरोधातील याचिकेत म्हटलं आहे की ते ईशा योग केंद्रात राहण्यासाठी तरुणींचं ब्रेनवॉश केलं जात आहे.

तमिळनाडू कृषी विद्यापीठातील माजी प्राध्यापक एस. कामराज यांनी त्यांच्या दोन मुलींना न्यायालयात प्रत्यक्ष हजर करण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली होती. त्यानंतर सोमवारी न्यायालयात दोन महिला (३९ व ४२ वर्षीय) हजर झाल्या. त्यांनी न्यायालयाला सांगितलं की “आम्हाला ईशा फाउंडेशनमध्ये बळजबरीने ठेवलेलं नसून आम्ही तिथे स्वेच्छेने राहत आहोत”.

हे ही वाचा >> Garba Pandal: ‘गरब्यात प्रवेश करण्यासाठी गोमूत्र प्राशन करायला द्या, जेणेकरून…’, भाजपा नेत्याचे अजब तर्कट

न्यायालय ईशा फाउंडेशनविरोधातील प्रकरणांमध्ये लक्ष घालणार

या महिलांनी दशकभरापूर्वी अशाच प्रकरणात साक्ष दिली होती. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या, त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना सोडून दिल्यानंतर त्यांचं जीवन नरक बनलं आहे. दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणाचा अधिक तपास करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी पोलिसांना निर्देश दिले आहेत की ईशा फाउंडेशनशी संबंधित सर्व प्रकरणांची एक यादी तयार करून न्यायालयासमोर सादर करावी.

हे ही वाचा >> Pakistani family in India: पाकिस्तानी कुटुंबानं ‘शर्मा’ नाव लावून बंगळुरूत केलं वास्तव्य; ‘असं’ फुटलं बिंग

जग्गी वासुदेव यांना न्यायालयाचा प्रश्न

न्यायमूर्ती शिवाग्ननम म्हणाले, “आम्हाला जाणून घ्यायचं आहे की एक इसम ज्यांनी स्वतःच्या मुलीचं लग्न लावून दिलं आहे. त्याची मुलगी इतर लोकांप्रमाणे संसारिक जीवन जगत आहे. तो इसम इतरांच्या मुलींना केशवपन करण्यासाठी व संन्यासी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित का करतोय?” तर, ईशा फाउंडेशनने दावा केला आहे की “महिला स्वेच्छेने त्यांच्या संस्थेबरोबर राहणं पसंत करतात”.

हे ही वाचा >> Israel Hezbollah War Updates : इस्रायल-लेबनॉनचा संघर्ष चिघळला, हेझबोलाविरोधात आता जमिनीवरून हल्ले!

ईशा फाउंडेशनचं म्हणणं काय?

ईशा फाउंडेशनने म्हटलं आहे की, आमचं असं मत आहे की प्रौढ व्यक्तींना त्यांचा स्वतःचा मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य आणि विवेक आहे. आम्ही कोणाला संन्यासी बनण्याचा आग्रह धरत नाही. कारण ती वैयक्तिक निवड किंवा निर्णय आहे. ईशा योग केंद्रात हजारो लोक राहतात. त्यापैकी बहुसंख्य लोक संन्यासी नाहीत. तर, काहीजण असे आहेत ज्यांनी ब्रह्मचारी होण्याचा किंवा संन्यासी होण्याचा निर्णय घेतला आहे.