प्रयागराज : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देशात मंदिर-मशीद वाद वाढवण्याच्या घटनांबद्दल नुकत्याच केलेल्या विधानावर उत्तर प्रदेशातील साधूसंतांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काही साधूंनी मंदिरांवर पुन्हा दावा केला पाहिजे अशी भूमिका मांडली तर काहींनी घटनात्मक चौकटींच्या अधीन राहूनच असे प्रश्न सोडवले पाहिजेत.

डॉ. भागवत अलिकडे एका भाषणामध्ये वाढत्या मंदिर-मशीद वादावर चिंता व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, काही व्यक्तींना असे वाटते की अयोध्येत राम मंदिर बांधल्यानंतर धार्मिक स्थळांवर नवीन वाद उपस्थित करून स्वत:ला हिंदू नेते म्हणवून घेता येईल. त्यांच्या या टिप्पणीवर अयोध्येच्या राम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांनी ऐतिहासिक मंदिरांच्या जागांवर पुन्हा दावा करण्यासाठी निर्णायक कृती करण्याची गरज आहे. दास हे १ मार्च १९९२पासून राम मंदिराचे मुख्य पुजारी आहेत.

हेही वाचा >>> शेख हसीना यांच्याविरोधात तपास सुरूच अणुऊर्जा प्रकल्पात पाच अब्ज डॉलरच्या भ्रष्टाचाराचा आरोप

दुसरीकडे, अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी सरसंघचालकांच्या राष्ट्रीय सौहार्द कायम राखण्यासंबंधी व्यापक दृष्टीकोनाला पाठिंबा दिला आहे. भारत सध्या आणखी अंतर्गत संघर्ष सहन करण्याच्या परिस्थितीत नाही असे सरस्वती म्हणाले. गेल्या वर्षभरात देशातील वाराणसी, मथुरा, संभल, भोजपूर, अजमेर अशा विविध ठिकाणच्या मुस्लीम धार्मिक स्थळांवर दावा करणाऱ्या याचिका वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये दाखल झाल्या आहेत.

आपण भागवत यांच्या विधानाचे महत्त्व ओळखले पाहिजे. धार्मिक आणि राष्ट्रीय प्रश्न घटनात्मक चौकटीतच सोडवले पाहिजे, आपल्या देशाला पुन्हा नागरी युद्धसदृश्य परिस्थिती परवडणार नाही. – स्वामी जितेंद्रानंद सरस्वती, राष्ट्रीय सरचिटणीस, अखिल भारतीय संत समिती

हिंदूंचे विस्थापन करून मंदिरे ताब्यात घेण्यात आली होती असे तपासात आढळले तर त्यांच्यावर पुन्हा दावा करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अशा ठिकाणांची ओळख पटवण्याचा आणि पूजा पुन्हा सुरू करण्याचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दृष्टीकोन योग्य आहे. – महंत सत्येंद्र दास, मुख्य पुजारी, राम मंदिर, अयोध्या

Story img Loader