अनुपम खेर यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आम्हाला जेलमध्ये पाठवून दाखवावेच, असे सांगत साध्वी प्राची यांनी बुधवारी अनुपम खेर यांना आव्हान दिले. आम्ही हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून आमचा लढा असाच सुरू ठेवू. जर अनुपम खेर यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मला आणि योगी आदित्यनाथ यांना जेलमध्ये पाठवून दाखवावे, असे प्राची साध्वी यांनी म्हटले. यावेळी त्यांनी मुझफ्फरनगर दंगलीसंदर्भात सादर करण्यात अहवालावर टीकाही केली. या अहवालातून दंगलीसाठी जबाबदार असणाऱ्या एका मोठ्या राजकीय नेत्याचे नाव वगळण्यात आल्याचा आरोप साध्वींनी यावेळी केला.
मागील आठवड्यात ‘टेलिग्राफ’ने आयोजित केलेल्या चर्चासत्रात बोलताना अनुपम खेर यांनी योगी आदित्यनाथ आणि साध्वी प्राची यांच्यावर सडकून टीका केली होती. हे दोघेजणही वायफळ बोलतात. त्यांना भाजपमधून हाकलून दिले पाहिजे आणि त्यांची रवानगी जेलमध्ये केली पाहिजे , असे रोखठोक मत खेर यांनी कार्यक्रमात व्यक्त केले होते.

Story img Loader