भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह शेरेबाजीनंतर जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. तर देशात राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरातसह अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली आहेत. झारखंडसारख्या राज्यात तर निदर्शनाला हिंसक वळण मिळाले असून पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, एकीकडे नुपूर शर्मा यांच्यावर जगभरातून टीका केली जात असताना भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली आहे. सत्य बोलणे हे बंड असेल तर मीदेखील बंडखोर आहे, असं प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटलंय.
हेही वाचा >>> काँग्रेसचे तीनही उमेदवार विजयी, भाजपचा डाव फसला!; राजस्थानमध्ये ‘गेहलोतनीती’ यशस्वी
“सत्य बोलणे हे जर बंड असेल तर समजून घ्या की मीदेखील बंडखोर आहे. जय सनातन जय हिंदुत्त्व,” अशा आशयाचं ट्विट साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलंय. तसेच या ट्विटनंतर त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. माध्यमांशी बोलताना “भारत हा हिंदुंचा देश आहे. तसेच येथे सनातन धर्म राहील. सत्य सांगितल्यावर इतरांना त्रास का होतो? कमलेश तिवारी यांनी काहीतरी सांगितले होते त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती,” असे प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या.
हेही वाचा >>> प्रेषित अवमानप्रकरणी निदर्शनांना हिंसक वळण ; पश्चिम बंगालमध्ये महिला ठार, उत्तर प्रदेशात १०९ निदर्शक अटकेत
तसचे पुढे बोलताना, “सत्य बोलते त्यामुळेच मी बदनाम आहे. तेथे (ज्ञानवापी मशीद) शिवमंदीर होते हे सत्य होते आणि भविष्यातही ते सत्यच असेल. शिवलिंगाला कारंजे म्हणणे म्हणजे हिंदू-देवीदेवता तसेच सनातन संस्कृतीवर आघात आहे,” असेही साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या.
हेही वाचा >>> ग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ED चे पुन्हा समन्स; २३ जूनला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
कुणीतरी (नुपूर शर्मा) एक वक्तव्य केलं. त्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली. ते आमच्या देवीदेवतांचा विपर्यास करतात. मागील अनेक वर्षांपासून हे सुरु आहे. यातूनच त्यांची मानसिकता दिसून येते, असे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या.
हेही वाचा >>> प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरण : झारखंडमध्ये निदर्शनाला हिंसक वळण, गोळीबारामध्ये दोघांचा मृत्यू; इंटरनेटसेवा बंद
दरम्यान, प्रेषित मोहोम्मद अवमानकारक वक्तव्याप्रकरणी भाजपाने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केलं आहे. मात्र त्यांना अटक करावी अशी मागणी करण्यात येत असून देशात वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. काही भागात या निदर्शनांना हिंसक वळण मिळाले आहे.