मध्य प्रदेशात भोपाळमध्ये एका साध्वीवर (४०) तिच्या शिष्यानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिसरोड वस्तीत तीन महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती. आरोपीने पीडित साध्वीला पोलिसात तक्रार दाखल केली तर जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकाराने हादरुन गेलेली ती साध्वी मेरठला आपल्या गुरुच्या आश्रमात निघून गेली. गुरुंच्या सल्ल्यावरुन ती पुन्हा भोपाळला आली व स्थानिक राजकीय नेत्याच्या मदतीने तिने पोलिसात तक्रार दाखल केली.

पीडित साध्वी धार्मिक कथावाचक असून ती मिसरोड येथील पॉश वस्तीत आपल्या दोन विश्वासू सहकाऱ्यांसमवेत रहाते. इंदिरा नगर येथे रहाणारा आरोपी जयपाल सिंह राजपूतला ती मागच्या दोन वर्षांपासून ओळखत होती. एका धार्मिक कार्यक्रमात दोघांची ओळख झाली होती. आरोपी जयपाल तिला बहिणीचा दर्जा देत होता. तिला तो दीदी म्हणून पुकारायचा. साध्वीचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीचे आश्रमात येणे-जाणे वाढले. तो तिला प्रवचन स्थळी नेऊन सोडायचा असे साध्वीने पोलिसांना सांगितले.

२२ जुलैला रात्री नऊच्या सुमारास जयपाल आश्रमात आला व आपल्याला भरपूर भूक लागली आहे असे सांगून साध्वीला चहा बनवायला सांगितला. तिने चहा बनवून आणला व बिस्किटे आणायला ती आतमधल्या खोलीत गेली. तीच संधी साधून आरोपीने तिच्या चहामध्ये गुंगीचे औषध मिसळले. साध्वी बेशुद्ध झाल्यानंतर जयपालने तिच्यावर बलात्कार केला व तिथून पळून गेला.

जेव्हा ती शुद्धीत आली तेव्हा आपल्यावर बलात्कार झाल्याचे तिला समजले. तिने फोन करुन जयपालला जाब विचारला तेव्हा त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. जेव्हा ३ ऑगस्टला साध्वी पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे त्याला समजले तेव्हा त्याने बंदूक रोखून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकाराने हादरुन गेलेली ती साध्वी मेरठला आपल्या गुरुंच्या आश्रमात निघून गेली.

Story img Loader