काही दिवसांपूर्वीच धर्मसंसदेमध्ये एका विशिष्ट समुदायाला दुसऱ्या समुदायाविरुद्ध हाती शस्त्र घेण्याचं आवाहन करणाऱ्या कालीचरण महाराज याच्या विधानावरून मोठा गदारोळ झाला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी अखिल भारतीय संत परिषदेचे हिमालयातील प्रभारी यती सत्यदेवानंद सरस्वती यांनी हिंदूंना भारत इस्लामिक राष्ट्र होण्यापासून रोखायचं असेल तर जास्त मुलांना जन्माला घालण्याचा सल्ला दिला. त्यावरून देखील वाद होण्याची शक्यता असताना आता अजून एका विधानावरून वाद निर्माण झाला आहे. हे विधान आहे साध्वी ऋतंभरा यांचं!
उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेने रामोत्सवाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमादरम्यान साध्वी ऋतंभरा यांचं देखील भाषण आयोजित करण्यात आलं होतं. या भाषणादरम्यान साध्वी ऋतंभरा यांनी केलेलं हे वादग्रस्त विधान चर्चेत आलं आहे.
“दोन मुलं देशासाठी समर्पित करा”
यावेळी साध्वी ऋतंभरा यांनी हिंदू समाजातील बांधवांना दोनऐवजी चार मुलं जन्माला घालण्याचं आवाहन केलं आहे. “तुम्ही तर दोन मुलं जन्माला घातली आहेत. हम दो, हमारे दो.. पण माझी विनंती आहे की हिंदू समाजाच्या बांधवांनो, दोन नाही, चार मुलांना जन्माला घाला. त्यातली दोन मुलं देशासाठी समर्पित करा. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक बनतील. ते बजरंगदलाचे बजरंगदेव बनतील. ते विश्वहिंदू परिषदेचे समर्पित कार्यकर्ते बनतील”, असं त्या म्हणाल्या आहेत.
“हिंदू राष्ट्रासाठी जाती-पातींमधून बाहेर पडा”
दरम्यान, यावेळी साध्वी ऋतंभरा यांनी हिंदू राष्ट्र घडवण्यासाठी जाती-पातींमधून बाहेर येण्याचं आवाहन देखील केलं. “हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी जाती-पातींमधून बाहेर या. राष्ट्रीय स्वाभिमान असायला हवा. कोणताही राजकीय पक्ष जातींचं गाजर दाखवून आपल्याला भुलवू शकत नाही. माझा देश आणि माझ्या देशाचं भलं सर्वतोपरी असायला हवं. हिंदू जातीचा हाच मंत्र असायला हवा”, असं त्या म्हणाल्या.
कालीचरण महाराजचं काय होतं विधान?
छत्तीसगडच्या राजधानीत भरलेल्या धर्मसंसदेमध्ये कालीचरण महाराजने महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरले. यावेळी त्याने गांधीजींना शिवीगाळ करताना मारेकरी नथुराम गोडसेला वंदनही केलं.
यती सत्यदेवानंद सरस्वती यांचं विधान…
अखिल भारतीय संत परिषदेचे हिमालयातील प्रभारी यती सत्यदेवानंद सरस्वती यांनी पीटीआयशी बोलताना म्हटलं आहे की, “भारतात लोकशाही असून हिंदू बहुसंख्यांक आहेत. पण नीट योजना आखल्याप्रमाणे जास्तीत जास्त मुलांना जन्म देत मुस्लीम त्यांची लोकसंख्या वाढवत आहेत. म्हणूनच आमच्या संस्थेने हिंदूंना भारत इस्लामिक राष्ट्र होण्यापासून रोखायचं असेल तर जास्त मुलांना जन्म देण्यास सांगितलं आहे,” असं यती सत्यदेवानंद म्हणाले आहेत.
हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यात तीन दिवसांची धर्मसंसद आयोजित करण्यात आली असून पहिल्या दिवशी बोलताना त्यांनी हे विधान केलं.