बनावट चकमकीत सादिक जमाल याच्या केलेल्या हत्येवरून केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) गुजरातच्या पाच पोलिसांना शनिवारी अटक केली. सीबीआय विशेष न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही चकमक २००३ मध्ये झाली होती. या चकमकीप्रकरणी सीबीआयने  पोलीस उपअधीक्षक तरुण बारोट यांच्यासह आठ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.
बारोट यांना २५ सप्टेंबरला अटक झाली असून सध्या ते साबरमती मध्यवर्ती तुरुंगात आहेत.
सीबीआयने शनिवारी पोलीस उपअधीक्षक जे. जी. परमार, पोलीस निरीक्षक जी. एच. गोहिल आणि आर. एल. मवानी, हेडकॉन्स्टेबल अजयपाल सिंग आणि छत्रसिंह चुडासामा यांना गांधीनगर येथे चौकशीसाठी बोलाविले आणि त्यानंतर त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करतानाच सीबीआयने थेट आरोपपत्रही दाखल केले. निवृत्त पोलीस आय. ए. सय्यद आणि के. एम. वाघेला यांच्याविरोधात अजामीनपत्र वॉरंट बजावण्याची मागणी सीबीआयने केली आहे.
मुंबईतील पत्रकार केतन तिरोडकर यांना या प्रकरणी सर्वप्रथम अटक झाली होती. त्यांच्याविरुद्ध मुदतीत आरोपपत्र दाखल न झाल्याने सध्या ते जामिनावर आहेत.    
प्रकरण काय?
भावनगरचा रहिवासी सादिक जमाल हा अहमदाबाद येथे १३ जानेवारी २००३ रोजी चकमकीत मारला गेला होता. मुंबईतील चकमकफेम पोलीस अधिकारी दया नायक यांनी सादिकला गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे आपण स्वत: पाहिले, असा दावा केतन तिरोडकर यांनी केला होता. त्यामुळे त्या चकमकीच्या खरेपणाविषयी शंका घेतली गेली. गेल्या जूनमध्ये सादिकचा भाऊ साबिर जमाल याच्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते.
सादिक होता कोण?
सादिक हा डॉन छोटा शकील याचा मेव्हणा तारिक परवीन याच्या दुबईतील घरी नोकर म्हणून काम करीत होता. तारिकशी त्याचा काही कारणाने खटका उडाल्यावर त्याला मुंबईला पाठविले गेले. त्याला अटक करण्याची आणि चकमकीत मारण्याची सुपारी तारिकनेच दिली, या निष्कर्षांप्रत सीबीआय आल्याचे ‘तहलका’ नियतकालिकाने म्हटले आहे.

Story img Loader