जमात उद् दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीझ सईद याच्याविरोधात भारताने पुरावे दिल्यास कारवाई करण्याचे आश्वासन पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार यांनी दिल्याबाबत हाफीझ सईदने कांगावा सुरू केला आहे. काश्मीरसारखा महत्त्वाचा मुद्दा पाकिस्तान सरकार सोडवू शकत नसल्याचे सांगत भारताला माझ्यावर कारवाईची भलतीसलती आश्वासने दिल्याचे त्याने सोमवारी स्पष्ट केले.  २००८ साली झालेल्या मुंबई हल्ल्याचा कट हाफीझ सईदने केल्याचा भारताचा दावा आहे. यासंबंधी भारताने दिलेल्या पुराव्यांना पाकिस्तानी न्यायालयाने रद्द केले आहे.
गेल्या चार वर्षांमध्ये या प्रकरणात मी सहभागी असल्याचा कोणताही पुरावा लाभलेला नाही. भारताने जी काही माहिती दिली आहे, ती न्यायालयात माझ्याविरोधात उभी राहू शकली नाही. लाहोर न्यायालयाने यापूर्वीच भारताच्या माहितीला रद्दबातल केले आहे. सर्वोच्च न्यायालयामध्येही हाच प्रकार झाला आहे, असे त्याने स्पष्ट केले. मुंबई हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने जमात उद् दवा या संघटनेला लष्कर- ए- तय्यबा संघटनेची हस्तक असल्याचे जाहीर केल्यानंतर सईद याला सहा महिन्यांहून अधिक काळ नजरकैदेमध्ये ठेवण्यात आले होते. लाहोर न्यायालयाने त्याची या नजरकैदेतून सुटका केली. पाकिस्तानमध्ये घडलेल्या घटनांप्रकरणी सईदला अनेकदा अटक करण्यात आली आहे. काश्मीर प्रश्न सोडविण्याचा मार्ग केवळ जिहाद असल्याचा प्रचार त्याच्याकडून केला जातो. अमेरिकेने सईदला पकडण्यासाठी १ कोटी डॉलर्सचे बक्षीस लावले आहे; तरीही पाकिस्तानमध्ये राजरोसपणे फिरणारा सईद भारत आणि अमेरिकेविरोधी मत निर्माण करणाऱ्या प्रचारसभा सातत्याने घेत असतो.