नवी दिल्ली : विमान उड्डाणांना विलंब होत असताना प्रवाशांच्या गैरसोयींवरून नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) आणि नागरी हवाई वाहतूक सुरक्षा कार्यालय (बीसीएएस) यांनी बुधवारी कारवाईचा बडगा उगारला. तीन दिवसांपूर्वी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर प्रवाशांनी जेवण केल्याप्रकरणी ‘इंडिगो’ आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दंड ठोठविण्यात आला आहे. तर वैमानिकांचे वेळापत्रक (रोस्टर) योग्य पद्धतीने न हाताळल्याबद्दल ‘एअर इंडिया’ आणि ‘स्पाईसजेट’ कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> चिथावणीखोर भाषणे नकोत! यवतमाळ व रायपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
रविवारी दिल्लीतील खराब हवेमुळे गोव्याहून उड्डाण केलेले ‘इंडिगो’ कंपनीचे विमान मुंबईकडे वळविण्यात आले. त्यानंतर विमानतळाच्या धावपट्टीवरच प्रवाशांनी ठाण मांडले आणि काही जणांनी तेथेच जेवणही केले. याची दृष्यफीत व छायाचित्रे समाजमाध्यमांमध्ये पसरल्यामुळे प्रवाशांची गैरसोय अधोरेखित झाली. याप्रकरणी ‘बीसीएएस’ने ‘इंडिगो’ आणि मुंबई विमानतळाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर बुधवारी ‘इंडिगो’ला १.२० कोटी रुपये तर मुंबई विमानतळाला ६० लाखांचा दंड ठोठावण्यात आला. शिवाय याच कारणासाठी ‘डीजीसीए’नेदेखील मुंबई विमानतळाला ३० लाखांचा दंड केला आहे.
दुसरीकडे ‘एअर इंडिया’ आणि ‘स्पाईसजेट’ कंपन्यांनी वैमानिकांच्या पाळयांची हाताळणी अयोग्य पद्धतीने केल्यावरून त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. कमी दृष्यमानता असताना उड्डाण करू शकणारे ‘सीएटी २/३’ तसेच कमी दृष्यमानतेमध्ये विमान उतरवू शकणारे ‘एलव्हीटीओ’ दर्जाच्या वैमानिकांच्या पाळया योग्य प्रकारे लावण्यात न आल्यामुळे विमानांना विलंब झाल्याचे चौकशीत आढळून आले आहे. याप्रकरणी दोन्ही कंपन्यांना ‘डीजीसीए’ने प्रत्येकी ३० लाख रुपयांचा दंड केला.
स्वच्छतागृहात अडकलेल्या प्रवाशाला भरपाई
‘स्पाईसजेट’च्या मुंबई-बंगळुरू विमानात स्वच्छतागृहाच्या दरवाजाचा खटका सदोष असल्यामुळे सुमारे मंगळवारी तासभर अडकून पडला होता. त्यानंतर कंपनीने त्या प्रवाशाला तिकिटाची संपूर्ण रक्कम परत करणार असल्याचे बुधवारी जाहीर केले. झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीने प्रवाशाची माफीही मागितली आहे.