कर्नाटक सरकारमधील माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते के. एस. ईश्वरप्पा आपल्या खळबळजनक विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एकेदिवशी आरएसएसचा भगवा झेंडा राष्ट्रीय ध्वज असेल, यात काही शंका नाही, असं विधान त्यांनी केलं आहे. के. एस. ईश्वरप्पा यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये देखील असंच विधान केलं होतं. त्यानंतर काल त्यांनी पुन्हा एकदा आपल्या विधानाची पुनरावृत्ती केली आहे.
त्यांनी म्हटलं की, “एक दिवस असा येईल जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा झेंडा राष्ट्रीय ध्वज असेल.” ईश्वरप्पा यांच्या विधानानंतर कर्नाटकातील राजकीय वातावरण तापलं आहे. अनेक राजकीय नेत्यांनी ईश्वरप्पा यांच्या विधानाचा निषेध केला आहे.
नेमकं काय म्हणाले के. एस. ईश्वरप्पा?
भाजपाचे ज्येष्ठ नेते के. एस. ईश्वरप्पा आपल्या विधानात म्हणाले की, “हजारो वर्षांपासून भगव्या झेंड्याचा आदर केला जात आहे. भगवा झेंडा हा त्यागाचं प्रतीक आहे. आरएसएसचा भगवा झेंडा एक दिवस भारताचा राष्ट्रीय ध्वज बनेल, यात काही शंका नाही. त्यागाची भावना जपण्यासाठी आरएसएस भगवा ध्वज समोर ठेवून पूजा करते. संविधानानुसार तिरंगा झेंडा हा राष्ट्रध्वज आहे आणि तिरंग्याला जो मान द्यायला हवा, तो आम्ही देतो.”
विशेष म्हणजे के. एस. ईश्वरप्पा यांनी फेब्रुवारी २०२२ मध्येही अशाच प्रकारचं विधान केलं होतं. त्यांच्या विधानानंतर देशात बराच गदारोळ झाला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, “आरएसएसचा भगवा झेंडा एक दिवस तिरंग्याची जागा घेईल. पण ते इतक्या लवकर शक्य होणार नाही, याला खूप वेळ लागू शकतो. पण येत्या काळात लाल किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवला जाईल.”