Prayagraj : रामनवमीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (६ एप्रिल) देशभरात विविध ठिकाणी मिरवणुका काढत रामनवमी उत्साहात साजरी झाली. मात्र, रामनवमीच्या दिवशी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये एका दर्ग्यावर भगवे झेंडे फडकवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. एका संघटनेशी संबंधित कार्यकर्त्यांनी प्रयागराजमधील सालार मसूद गाझी दर्ग्याच्या छतावर चढून भगवे झेंडे फडकवल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. तसेच या संदर्भातील तपास सुरु करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे. या व्हिडीओत दिसणाऱ्या तरुणांची ओळख पटवण्याचं काम सुरु असल्याचंही पोलिसांनी सांगितलं असून व्हायरल व्हिडीओतील ते तरुण एका संघटनेशी संबंधित असल्याचंही सांगितलं जात आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
प्रयागराजमध्ये रविवारी संध्याकाळी ४.२० वाजताच्या सुमारास काही तरुणांनी बाईक रॅली काढली होती. ही रॅली सिकंदर भागात असलेल्या सालार मसूद गाझीच्या दर्गाजवळून गेली. मात्र, रॅली सालार मसूद गाझीच्या दर्गाजवळून जात असताना रॅलीतील तीन, चार तरुण दर्ग्याच्या छतावर चढले आणि त्यांनी दर्ग्यावर भगवा ध्वज फडकवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, दर्ग्यावर भगवे झेंडे फडकवणारे तरुण हे एका संघटनेचे कार्यकर्ते असल्याचा दावा केला जात आहे. तसेच या बाईक रॅलीचे नेतृत्व एका संघटनेचा व्यक्ती करत होता, अशी माहिती सांगितली जात असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. तसेच या घटनेच्या व्हिडीओमध्ये ते तरुण जोरदार घोषणाबाजी करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
या घटनेसंदर्भात फुलपूरच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की, “काही तरुण सालार मसूद गाझी दर्ग्याच्या गेटवर चढले होते आणि घोषणाबाजी केल्यासचा प्रकार समोर आला आहे. या घटनेबाबत माहिती मिळताच बहरिया पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर सध्या संबंधित दर्ग्याबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे”, असं त्यांनी सांगितलं.