युवा कुस्तीपटू सागर धनकर याच्या हत्येप्रकरणी तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या भारतीय ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशीलकुमारला जामीन मंजूर झाला असून त्याची तिहार जेलमधून सध्या सुटका झाली आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार सुशील कुमारची पत्नी आजारी असून तिच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे, यामुळे न्यायालयाने सुशीलकुमारला जामीन मंजूर केला आहे. सागर हत्याकांडात सुशीलकुमारसह एकूण १८ आरोपींचा समावेश आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव सुशीलकुमारला तुरुंग प्रशासनाने गेट नंबर ४ ऐवजी अन्य मार्गाने तुरुंगातून बाहेर सोडल्याचीही माहिती समोर आली आहे. सुशीलकुमारच्या सुटकेचे आदेश कालच(शनिवार) पोहचले होते, तर त्याला अंतिम जामीन शुक्रवारीच देण्यात आला होता. अशी माहिती समोर आली आहे की, सुशीलकुमारच्या पत्नीवर ७ नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया होणार आहे. तर न्यायालयाने सुशील कुमाराच्या सुरक्षेसाठी आणि देखरेखीसाठी दोन सुरक्षा रक्षकही तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश शिवाजी आनंद यांनी सुशीलकुमारला १२ नोव्हेंबरपर्यंत जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर करताना न्यायालयाने अनेक अटीही ठेवल्या आहेत. सरकारी वकिलाने मात्र या जामीनास विरोध दर्शवला होता मात्र परिस्थिती पाहून न्यायालयाने सुशीलकुमारला जामीन मंजूर केला.
आपल्या आदेशात न्यायालयाने म्हटले की, आरोपीची पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांना पाहता जामीन मंजूर केला जात आहे. याचबरोबर न्यायालयाने हेही सांगितले की, जामिनाची मुदत संपताच सुशीलकुमारला कारागृह अधीक्षकासमोर हजर व्हावे लागेल. म्हणजेच १३ नोव्हेंबर रोजी सुशील कुमारला हजर व्हावे लागणार आहे.
हेही वाचा – Andheri East Bypoll Election Result : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल
या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सुशीलकुमारला अटक केली होती. सुरुवातीला तो फरार झाल्याने त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी एक लाखाचे रोख इनामसुद्धा जाहीर केले होते.