गुंतवणूकदारांना तब्बल २० हजार कोटींचा गंडा घालूनही उजळ माथ्याने फिरणारे सहारा समूहाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावत त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. रॉय यांना तिहार तुरुंगात पाठवण्यात आले असून प्रकरणावरील सुनावणी आता ११ मार्च रोजी होईल.
गेल्या अनेक महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्यास टाळाटाळ करणाऱ्या रॉय यांना २८ फेब्रुवारीला त्यांच्या लखनऊ येथील निवासस्थानी अटक करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी त्यांना सर्वोच्च न्यायालयात हजर करण्यात आले. आपण आपल्या समूहातील कंपन्यांच्या स्थावर मालमत्ता विकून गुंतवणूकदारांची देणी देऊ, असे आश्वासन सहाराश्रींनी सर्वोच्च न्यायालयाने दिले. मात्र, त्यांच्या उत्तराने समाधान न झालेल्या सर्वोच्च न्यायालयाने रॉय व त्यांचे दोन सहकारी अशोक रॉय चौधरी आणि रविशंकर दुबे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. गुंतवणूकदारांची देणी रोख स्वरूपात द्यायची नसून धनादेश किंवा धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) या स्वरूपात द्यायची आहेत, त्या संदर्भात ठोस उपाय सादर केले जाईपर्यंत रॉय न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.
शाईने तोंड काळे
न्यायालयाच्या आवारात एका तरुणाने रॉय यांच्या तोंडावर काळी शाई फेकली. ‘सुब्रतो रॉय सहारा चोर है’, अशा घोषणाही त्याने दिल्या. मनोज शर्मा असे या तरुणाचे नाव आहे. सहाराने गरिबांचे पैसे लुटले असून अशा चोरांची आपल्याला चीड असल्यानेच आपण हे कृत्य केल्याचा दावा मनोजने केला आहे. तसेच आपण वकील असल्याचेही त्याचे म्हणणे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा