‘सहारा’चे प्रमुख सुब्रतो रॉय यांना सोमवारी पोलीसांच्या गाडीमधून दिल्लीला नेण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने रॉय यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केल्यानंतर त्यांना गेल्या शुक्रवारी लखनौमध्ये अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयात दाखल करेपर्यंत रॉय यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश लखनौमधील मुख्य महानगरदंडाधिकाऱयांनी दिला होता. त्यामुळे शुक्रवारपासून रॉय हे पोलीसांच्या ताब्यात होते.
रॉय यांना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करायचे असल्यामुळे त्यांना सोमवारी दुपारी पोलीस गाडीतून नवी दिल्लीकडे नेण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक हबिबुल हसन यांनी सांगितले. रॉय यांना कानपूरमार्गे सर्वोच्च न्यायालयात नेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या शुक्रवारी रॉय यांनी पोलीसांपुढे शरणागती पत्करल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याच्या मुद्द्यावरून रॉय यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. या खटल्याच्या सुनावणीला अनुपस्थित राहिल्यामुळे त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.

Story img Loader