आपल्याला पोलीस कोठडी देणे बेकायदेशीर असल्याचा कांगावा करीत त्याविरुद्ध दावा करणाऱ्या सहारा समूहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांच्या याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारवर ढकलल्याने तुरुंगातून सुटण्याची रॉय यांची इच्छा मंगळवारीही निष्फळ ठरली. गुंतवणूकदारांच्या २० हजार कोटी रुपयांचा परतावा न केल्यावरून ते तिहार तुरुंगात आहेत.
सरन्यायाधीश पी. सतशिवम यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही याचिका न्या. के. एस. राधाकृष्णन आणि न्या. जे. एस. खेहर यांच्या पीठाकडे सुपूर्द केल्याने रॉय यांच्या वकिलांना मंगळवारी हादरा बसला. याच खंडपीठाने ४ मार्चला रॉय यांची तिहार तुरुंगात रवानगी केल्याने याच पीठासमोर, त्यांचा आधीचा निर्णय चुकीचा होता, हा युक्तिवाद करावा लागणे अ‍ॅड. राम जेठमलानी यांनाही अडचणीचे झाले होते. युक्तिवाद सुरू करताना अ‍ॅड. जेठमलानी म्हणाले की, तुमच्या आधीच्या आदेशात दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे, हे तुम्हाला सांगणे माझ्यासाठी काहीसे संकोचाचे आहे. तरीही न्यायाधीश महोदय जर ऐकण्यास तयार असतील तर त्यांचा आधीचा निकाल का चुकीचा आहे, हे मी त्यांना पटवून देऊ शकेन.
यावर, आम्ही आधी याचिकेत मांडलेले मुद्दे पाहू आणि मग आम्ही संकोचलो आहोत की नाहीत ते स्पष्ट करू, असा टोला न्या. खेहर यांनी हाणला. याचिकेची सुनावणी बुधवारी होईल आणि त्याच वेळी आम्ही आमची भूमिका मांडू, असेही न्या. खेहर यांनी स्पष्ट केले.
त्याआधी अ‍ॅड. जेठमलानी यांनी सरन्यायाधीश सतशिवम यांच्यासमोर ही याचिका दाखल करताना, खंडपीठाच्या निकालात चूक झाली असून ती तातडीने दुरुस्त करण्याची गरज आहे, अशी मागणी केली होती. दुपारी दोन वाजताच सरन्यायाधीशांनी हे प्रकरण ऐकावे, अशीही त्यांची विनंती होती.
याआधी सात मार्चच्या सुनावणीत ठेवी परत करण्यासाठीचा तोडगा मांडण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहारा समूहाला सांगत सुनावणी ११ मार्चवर ढकलली होती. ११ मार्चलाही हा खटला प्रलंबित झाला आणि त्याची पुढील तारीखही जाहीर केली गेली नाही. गुंतवणूकदारांना अडीच हजार कोटी तीन दिवसांत देऊ आणि उरलेली रक्कम जुलै २०१५पर्यंत देऊ, हा सहाराचा प्रस्तावही विशेष पीठाने फेटाळला होता आणि त्यांची तुरुंगात रवानगी केली होती.
रॉय यांच्यामागे रविशंकर प्रसादही!
आपल्याला नेमके कोणत्या कारणावरून तुरुंगात ठेवले आहे, हे खंडपीठाने स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे आपल्याला तुरुंगात ठेवणे हे बेकायदेशीर, कायद्याने जी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत त्यांना मारक आणि नैसर्गिक न्यायालाही छेद देणारे आहे, असा दावा रॉय यांनी केला आहे. ज्या दोन कंपन्यांनी गुंतवणूकदारांकडून पैसा गोळा केला आहे त्या कंपन्यांच्या संचालकपदी वा कोणत्याही पदावर रॉय नाहीत. त्यामुळे ठेवी बुडवण्याशी रॉय यांचा संबंध नाही, असाही दावा याचिकेत आहे.
या याचिकेवर राम जेठमलानी यांच्यासोबत भाजपचे अ‍ॅड. रवि शंकर प्रसाद यांचीही स्वाक्षरी आहे! याचिकेवर अ‍ॅड. राजीव धवन, अ‍ॅड. राकेश द्विवेदी, एस. गणेश यांच्याही स्वाक्षऱ्या आहेत.

Story img Loader