सहारा समुहाचे सर्वेसर्वा सुब्रतो राय यांना अटक करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी सेबीने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाकडे केली. राय देश सोडून जाऊ नये, यासाठी त्यांचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणीही करण्यात आलीये. आपल्या दोन कंपन्यांसाठी गुंतवणूकदारांकडून जमविलेले २४ हजार कोटी रुपये परत करावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राय यांना दिला होता. मात्र, अद्याप त्यांनी पैसे परत न केल्याने सेबीने त्यांच्या अटकेसाठी न्यायालयात धाव घेतली.
न्या. के. एस. राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे या विषयाची शुक्रवारी सुनावणी झाली. सेबीची बाजू ऐकून घेतल्यावर न्यायालयाने याप्रकरणी पुढील सुनावणी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे स्पष्ट केले. सुब्रतो राय यांच्यासह त्यांच्या कंपनीचे दोन संचालक अशोक राय चौधरी आणि रविशंकर दुबे यांनाही अटक करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करण्यात आली. या तिघांनाही आपली बाजू मांडण्यात पुरेशी संधी देण्यात आली असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले.
सहारा समूहातील सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन आणि सहारा हाऊसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन या दोन कंपन्यांनी गुंतवणूकदारांकडून घेतलेले पैसे न्यायालयाच्या आदेशानंतरही अद्याप परत दिलेले नाहीत.