कोणत्याही संगीतकारापेक्षा एक रुपया अधिक मानधन घेऊन आपल्या शायरीची प्रतिष्ठा जपणारे दिवंगत शायर साहिर लुधियानवी यांच्या स्मरणार्थ सरकारतर्फे टपाल तिकीट काढण्यात आले आहे. साहिर यांच्या ९२व्या जन्मदिनाचे औचित्य साधत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी या टपाल तिकिटाचे प्रकाशन केले.
एखाद्या कवीच्या मृत्यूनंतर तब्बल ३३ वर्षांनी टपाल तिकीट निघणे यातच त्याची लोकप्रियता सिद्ध होते. साहिर यांनी नेहमी सर्वसामान्यांचा प्रतिनिधी या नात्याने गीते लिहिली.
उर्दूतील साहित्य चित्रपटगीतांत आणणे हे त्यांचे मोठे काम होते. त्यांच्या काव्यात नेहमी प्रेम आणि सौंदर्य यांचा आविष्कार होत असे, अशा शब्दांत मुखर्जी यांनी या शायरचा गौरव केला. समकालीन गीतकारांना मान्यता व चांगले मानधन मिळावे, यासाठी त्यांनी दिलेल्या लढय़ाचाही मुखर्जी यांनी आवर्जून उल्लेख केला.
या कार्यक्रमाला कपिल सिबल, मनीष तिवारी आदी केंद्रीय मंत्रीही उपस्थित होते. सिबल यांनी या वेळी साहिर यांच्या काही रचनांचे काव्यवाचन केले.

Story img Loader