घुमान गावात होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे घुमानवासीयांसाठी ‘गुढीपाडवा’ आहे, अशी भावना मूळचे घुमानवासीय असलेले आणि आता व्यवसायानिमित्ताने चाकण येथे स्थायिक झालेले सतनाम सिंह यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केली. घुमान साहित्य संमेलनासाठी ते खास पंधरा दिवसांसाठी आपल्या मूळ गावी आले आहेत.
सतनाम सिंह यांचा चाकण येथे कंटेनर आणि निगडी येथे वाहतुकीचा व्यवसाय आहे. मराठी साहित्य संमेलनाबाबत ऐकले होते. आज ते आमच्या घुमान गावात होत असल्याबद्दल खूप आनंद व उत्साह आहे. घुमानवासीयांसाठी बाबा नामदेव हे श्रद्धेचे स्थान आहे. व्यवसायाच्या निमित्ताने घुमानबाहेर असल्याने बाबा नामदेव यांच्या समाधीचे दर्शन पंधरा दिवसांतून एकदा गावी आल्यानंतर मिळत होते. आता इकडेच आल्यामुळे दिवसातून दोन वेळा म्हणजे किमान ३० वेळा तरी त्यांची दर्शन होईल, याचाही आनंद असल्याचे सतनाम सिंह म्हणाले.
श्री नामदेव दरबार समितीचे विश्वस्त आणि माजी पंच सुखजिंदर सिंह लाली म्हणाले, गावात होणाऱ्या या संमेलनामुळे आमचे गाव एकदम प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. चांगले रस्ते, वीज, पाणी, स्वच्छता आम्हाला मिळाली आहे. अशा प्रकारचे साहित्य संमेलन यापूर्वी कधी पाहिले नव्हते.
घुमान गावातील दुकानदार संघटनेचे अध्यक्ष तरलोचन सिंह यांनी मराठी साहित्य संमेलनाबाबत फारशी काहीही माहिती नाही. साहित्य संमेलनाबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, बाबा नामदेव यांच्यामुळे आमच्या गावाचे नाव उंचावले आहेच. आता या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आणखी भर पडली आहे. मराठी भाषेमध्ये अशा प्रकारे साहित्य संमेलन होत असते याविषयी माहिती नव्हती. आमच्या पंजाब शासनानेही हे संमेलन ‘स्टेट इव्हेंट’ म्हणून जाहीर केला. त्यामुळे एकूणच संमेलनात काय काय असेल, कार्यक्रम कोणते असतील याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
इतक्या लांबून तुम्ही सगळे आमच्या घुमान गावात येऊन हे साहित्य संमेलन करीत आहात. आम्हा घुमानवासीयांसाठी तो खूप मोठा आनंदाचा क्षण आहे, अशी भावना गावातील दुकानदार सुप्रितसिंह राजू यांनी व्यक्त केली.
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने संपूर्ण घुमान गाव आणि गावकरीही संमेलनमय झाले आहेत. पंजाबी लोकांच्या आदरातिथ्याचा आणि आनंदाचा अनुभव बाहेरून आलेल्या मंडळींना येत आहे.
साहित्य संमेलन म्हणजे घुमानवासीयांसाठी गुढीपाडवा!
घुमान गावात होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे घुमानवासीयांसाठी ‘गुढीपाडवा’ आहे, अशी भावना मूळचे घुमानवासीय असलेले आणि आता व्यवसायानिमित्ताने चाकण येथे स्थायिक झालेले सतनाम सिंह यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केली.
First published on: 03-04-2015 at 03:34 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sahitya sammelan gudipadwa for ghuman people