Sai Baba Temple Row : उत्तर प्रदेशातील काशीतील १० मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात आल्या आहेत. यामध्ये काशी येथील प्रसिद्ध गणेश मंदिर आणि पुरुषोत्तम मंदिर यांचाही समावेश आहे. यामुळे काशीमध्ये वाद निर्माण झाला आहे. सनातन रक्षक दलाचं याबाबत हे म्हणणं आहे की आम्ही साईबाबांचे विरोधक नाही. पण हिंदू मंदिरात साईंच्या मूर्तीची पूजा केली जाऊ नये ही आमची इच्छा आहे. मंदिर समितीची संमती घेतल्यानंतरच आम्ही या मूर्ती हटवल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साईबाबांच्या मूर्तींमुळे अनेकदा वाद

साईबाबांच्या मंदिरांमध्ये असलेल्या मूर्तींमुळे याआधीही वाद झाला आहे. शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी तर याबाबत एक मोहीम चालवली होती. तसंच काही दिवसांपूर्वी बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री यांनीही साईबाबांची पूजा करु नका असा सल्ला दिला होता.

सनातन रक्षक दलाने नेमकं काय केलं?

सनातन रक्षक दलाने काशी येथील मंदिरांमध्ये असलेल्या साईबाबांच्या मूर्ती हटवल्या आहेत. त्यांनी मूर्तींवर कापड टाकलं आणि त्यानंतर त्या मंदिरांमधून हटवल्या. गणेश मंदिरातूनही साई बाबांची मूर्ती हटवण्यात आली. त्यानंतर एकूण दहा मंदिरांमधल्या साईंच्या मूर्ती हटवण्यात आल्या. आम्ही ही कारवाई बुधवारीही सुरु ठेवणार आहोत असं सनातन रक्षक दलाने म्हटलं आहे.

साईबाबांच्या मूर्ती का हटवण्यात आल्या?

सनातन रक्षक दलाचं हे म्हणणं आहे की हिंदू मंदिरात शास्त्रांमध्ये सांगितली आहे तशीच पूजा केली जाऊ शकते. शास्त्र असे सांगते की हिंदू मंदिरांमध्ये कुठल्याही माणसाची मूर्ती ठेवून त्या मूर्तीची पूजा करु नये. आम्ही या मूर्ती हटवत आहोत पण आम्ही साईंचे विरोधक नाही. आम्ही या मूर्ती दुसऱ्या ठिकाणी नेत आहोत. बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री यांनीही काही दिवसांपूर्वी साईंची पूजा करु नका असं म्हटलं होतं. साईबाबांना संत महात्मा म्हणून पूजण्यात काहीही गैर नाही. मात्र त्यांना देव म्हणून पूजणं चुकीचं आहे अशी आमची धारणा आहे असं सनानत रक्षक दलाने सांगितलं. DNA ने हे वृत्त दिलं आहे.

शिर्डीत साईबाबांचं भव्य मंदिर

महाराष्ट्रात शिर्डीमध्ये साईबाबांचं भव्य मंदिर आहे. शिर्डी या गावात त्यांचं वास्तव्य होतं, तसंच त्यांची समाधीही याच ठिकाणी आहे. शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी देशभरातले लाखो भाविक येत असतात. साईबाबांनी कधीही कुठला जात-धर्म-पंथ यांचा भेद मानला नाही. त्यांनी समाधी घेतल्यानंतर त्यांचं मंदिर बांधण्यात आलं. त्यांच्या मंदिरात लाखो भाविक येत असतात. काशीमध्ये घडलेल्या घटनेमुळे मात्र नव्या वादाला तोंड फुटलं आहे. समाजवादी पक्षाने हे सनातन रक्षक दलाकडून जाणीवपूर्वक केलं जातं आहे असा आरोप केला आहे. तसंच इतरही नेत्यांनी या प्रकरणात भाजपावर टीका केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sai baba idols removed from 10 temples in kashi by sanatan rakshak dal scj