White Hose Attack Accused : सध्या अमेरिकेत राहत असलेल्या साई वरिष्ठ कंदुला या २० वर्षांच्या भारतीय तरुणाने मे २०२३ मध्ये भाड्याने घेतलेल्या ट्रकने व्हाईट हाऊसवर हल्ला केला होता. या प्रकरणी आता अमेरिकन न्यायालयाने त्याला ८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान अमेरिकन न्याय विभागाने दिलेल्या माहितीनुसार या तरुणाला जो बायडेन यांचे सरकार उलथवून त्या जागी नाझी विचारसरणीने चालणारी हुकूमशाही आणायची होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील जिल्हा न्यायाधीश डॅबनी फ्रेडरिक यांनी या भारतीय तरुणाला त्याच्या तुरुंगवासाच्या शिक्षेनंतर तीन वर्षे देखरेखीखाली ठेवण्याचे आणि त्याला सुमारे ५० लाख रुपये दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.

या खटल्याच्या सुनावणीवेळी बचाव पक्षाचे वकील स्कॉट रोसेनब्लम यांनी दावा केला की, “साई वरिष्ठ कंदुला स्किझोफ्रेनियाने ग्रस्त असून, तो भ्रामक विचारांनी ग्रासलेला होता. त्याला वाटायचे की, एका सरपटणाऱ्या प्राण्यांच्या जातीने अमेरिका चालवण्यासाठी कठपुतळी राजवट स्थापित केली आहे.”

अमेरिकन अध्यक्षांची हत्या केली असती

दरम्यान साई वरिष्ठ कंदुला याच्या चौकशीनंतर पोलिसांनी धक्कादायक दावे केले होते. “आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक असल्यास त्याने अमेरिकन अध्यक्ष आणि इतरांची हत्याही केली असती. याचबरोबर हल्ल्यानंतर त्याला अटक करण्यात आले तेव्हा तो तो नाझी ध्वज फडकवत होता,” असे अमेरिकन पोलिसांनी सांगितले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

न्यायालयीन कागदपत्रांमध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार, आरोपी २२ मे २०२३ रोजी सेंट लुईस, मिसूरी येथून वॉशिंग्टन डी.सी. ला विमानाने आला. संध्याकाळी ५:२० वाजता डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यानंतर ६:३० वाजता त्याने ट्रक भाड्याने घेतला. यानंतर त्याने ट्रकमध्ये गॅस भरला आणि काही पदार्थ खरेदी केले. रात्री ९:३५ वाजता, त्याने भाड्याने घेतलेला ट्रक व्हाईट हाऊसजवळील बॅरिकेड्सला धडकवला. यामुळे घटनेवेळी तिथे असलेले पादचारी पळून गेले. बॅरिकेड्सला दोनदा धडक दिल्यानंतर, ट्रक बंद पडला आणि त्यातून धूर निघू लागला. यानंतर हा तरुण गाडीतून बाहेर पडला आणि नाझी स्वस्तिक असलेला लाल-पांढरा ध्वज फडकावूला लागला, इतक्यात त्याला पोलिसांनी अटक केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sai varshith kandula indian nazi sympathiser sentenced to 8 years for white house truck attack aam