Saif Ali Khan Attack : प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी मध्यरात्री भीषण हल्ला झाला. हल्ला झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. या फरार आरोपीच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी जंगजंग पछाडलं. त्याच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी ३० पथकेही तैनात केली होती. अखेर एका संशयिताला छत्तीसगडच्या दुर्गा रेल्वे स्थानकातून ताब्यात गेण्यात आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आज दुपारी एका संशयिताला दुर्ग येथे ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोलकाता शालिमारपर्यंत धावणाऱ्या ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमध्ये हा संशयित आरोपी होता. ही रेल्वे एलटीटी येथून ८.३५ वाजता निघते, तर ४.३५ वाजता शालिमार येथे पोहोचते.
अभिनेता सैफ अली खान पर हमला मामला: अभिनेता सैफ अली खान पर हमला मामले में छत्तीसगढ़ के दुर्ग से हिरासत में लिए गए संदिग्ध आकाश कनौजिया की तस्वीर।
— ANI_HindiNews (@AHindinews) January 18, 2025
मुंबई पुलिस के सहायक पुलिस निरीक्षक जुहू पुलिस स्टेशन से इस संदिग्ध के बारे में सूचना मिली कि एक संदिग्ध ज्ञानेश्वरी एक्सप्रेस ट्रेन… https://t.co/QxHIXNgEIz pic.twitter.com/NRBKSBsUyt
मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलं, ट्रेनमध्ये चढलेल्या एका व्यक्तीचा शोध घेण्यासाठी त्याचा फोटो आरपीएफला पाठवण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे छत्तीसगडमधील आरपीएफने जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलं. यानंतर मुंबई पोलिसांचं एक पथक हवाईमार्गे छत्तीसगडला पोहोचले आणि त्याला ताब्यात घेतलं. पोलीस आणि आरपीएफ त्याची चौकशी करत आहेत. दरम्यान, त्याचं नाव आकाश कनौजिया असून मुंबई पोलीस अधिक चौकशी करणार आहेत.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसलं?
हल्लेखोराने सैफच्या घरातून बाहेर पडल्यावर कपडे बदलले होते. दोन ठिकाणी तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला होता, त्याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला होता. अभिनेत्यावर हल्ला होऊन ५० तासांहून अधिक काळ लोटला, तरीही हल्लेखोराचा शोध सुरूच आहे. घुसखोराचे एक ताजे सीसीटीव्ही फुटेज आदल्या दिवशी समोर आले होते, ज्यामध्ये तो सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर दादरमधील एका दुकानातून हेडफोन खरेदी करताना दिसला होता. तसंच, मध्य प्रदेशमधूनही एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, हल्लेखोर सैफ अली खानचा धाकटा मुलगा जेहच्या खोलीतील बाथरूममध्ये होता. घरातील मदतनीसने त्याला पाहिलं. त्याच्या हातात काठी व चाकू होते. तो जेहच्या पलंगाकडे धावत गेला, पण मदतनीसने त्याला अडवलं. हा गोंधळ ऐकून सैफ व करीना तिथे पोहोचले. तिथे सैफची त्याच्याबरोबर झटापट झाली. त्याचदरम्यान त्याने चाकूने सैफवर वार केले. सैफला मानेला, हाताला, पाठिला गंभीर जखमा झाल्या. तसेच मानेमध्ये चाकूचे टोक घुसले होते. घरातील मदतनीस व तैमूरने सैफला रिक्षातून रुग्णालयात नेलं. नंतर लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्याच्या पाठीतून चाकूचे टोक काढले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याला दोन ते तीन दिवसांत डिस्चार्ज देण्यात येईल.